Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

कागलमध्ये जागतिक दर्जाची ‘शाहू सृष्टी’; राजर्षी शाहू महाराजांचा विचार देश-विदेशात पोहोचणार

२० एकर जागेवर तीन वर्षांत महत्त्वाकांक्षी प्रकल्प; संग्रहालयासह डिजिटल केंद्र, ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती, अॅडव्हेंचर पार्क आणि पर्यटन निवासाची सुविधा

मुंबई : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव कागल येथे त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि सामाजिक सुधारणांच्या वारशाचा परिचय पुढील पिढ्यांना करून देण्यासाठी जागतिक दर्जाची ‘शाहू सृष्टी’ उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प केवळ संग्रहालयापुरता मर्यादित न ठेवता इतिहास, संस्कृती, शिक्षण, पर्यटन आणि निसर्ग यांचा संगम असलेले आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दालनात या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. कागल नगरपालिका आणि राज्य शासनाच्या निधीतून हा प्रकल्प साकारण्यात येणार असून, तो तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रकल्पासाठी नगरपालिकेची सुमारे २० एकर जमीन निश्चित करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा सविस्तर थ्रीडी आराखडा तयार करण्याचे निर्देशही मुश्रीफ यांनी दिले.

‘शाहू सृष्टी’मध्ये राजर्षी शाहू महाराजांचे जीवनकार्य आणि सामाजिक विचार आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहेत. आधुनिक संग्रहालय, डिजिटल माहिती केंद्र, प्रदर्शन दालने, ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती, अॅम्फिथिएटर, स्थानिक खाद्यपदार्थ आणि स्मृतिचिन्हांची दुकाने यांसह पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पर्यटकांच्या मनोरंजनासाठी अॅडव्हेंचर पार्क, झिपलाइन, रोप-कोर्स, क्लब हाऊस, रेस्टॉरंट, स्विमिंग पूल, जीम, इनडोअर गेम्स आणि बँक्वेट हॉल यांसारख्या सुविधांचा समावेश असेल. तसेच कॉटेज आणि डॉर्मिटरीच्या माध्यमातून पर्यटकांच्या निवासाची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.

हेही वाचा –  गणेशखिंडच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मनसेचे आंदोलन; अमित ठाकरे यांच्यासह २५ जणांविरुद्ध गुन्हा

या प्रकल्पाचे प्रमुख आकर्षण म्हणून राजर्षी शाहू महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यांच्या जन्मस्थानासह जीवनप्रवासाशी संबंधित महत्त्वाच्या वास्तूंच्या प्रतिकृती साकारल्या जाणार आहेत. तसेच महाराणी लक्ष्मीबाई जलाशय अर्थात राधानगरी धरण आणि रंकाळा तलावाच्या प्रतिकृतीही परिसरात उभारण्याचे नियोजन आहे.

राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षण, सामाजिक न्याय, आरोग्य, कला, क्रीडा, उद्योग आणि लोककल्याण क्षेत्रातील योगदान आधुनिक आणि अनुभवाधारित पद्धतीने पर्यटक तसेच विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात येणार आहे. त्यांच्या विचारांचे अध्ययन, संशोधन आणि समाजजागृतीसाठी स्वतंत्र प्रशासकीय व शैक्षणिक केंद्र उभारण्याची संकल्पनाही मांडण्यात आली आहे.

परिसरात मोठ्या प्रमाणात हिरवाई विकसित करून निसर्गाशी सुसंगत वातावरण तयार केले जाणार आहे. विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी बहुउद्देशीय सभागृह तसेच खुल्या रंगमंचाची सुविधाही प्रस्तावित आहे.

‘शाहू सृष्टी’ प्रकल्पाला व्यापक स्वरूप देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्यासमोरही प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे कागलच्या पर्यटन विकासाला चालना मिळण्यासोबतच राजर्षी शाहू महाराजांचा समतावादी आणि पुरोगामी विचार देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button