ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

STP शुल्काच्या प्रस्तावाला सोसायटी फेडरेशनचा तीव्र विरोध

सोसायटी धारकांवर आर्थिक बोजा टाकणारे धोरण मंजूर करू नका; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या दि. २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावरील विषय क्रमांक ४ मधील STP व जलनिःस्सारण जोडणी शुल्काच्या प्रस्तावाला चिखली-मोशी-चऱ्होली पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने तीव्र विरोध दर्शविला आहे. नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकणारा हा प्रस्ताव सध्याच्या स्वरूपात मंजूर करू नये, अशी मागणी फेडरेशनने केली आहे.

STP कार्यरत ठेवणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आणि प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर वाढविणे या पर्यावरणपूरक उद्दिष्टांना फेडरेशनचा विरोध नसून, या उद्दिष्टांच्या नावाखाली सोसायटीधारकांवर अतिरिक्त व दुहेरी शुल्काचा भार टाकण्यास विरोध असल्याचे फेडरेशनने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

टिटवाळ्यात विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे!

प्रस्तावातील दोन वेगवेगळ्या तक्त्यांमध्ये निवासी वापरासाठी ₹५०० प्रति गाळा शुल्काचा उल्लेख असून, त्यासोबत ₹१० हजार प्रति जलनिःस्सारण जोडणी शुल्क प्रस्तावित आहे. त्यामुळे एकाच प्रक्रियेसाठी दुहेरी शुल्क आकारले जाणार आहे का, असा सवाल फेडरेशनने उपस्थित केला आहे. तसेच प्रस्तावानुसार विकासकाने शुल्क भरणे अपेक्षित असले, तरी विकासकाने शुल्क न भरल्यास भविष्यात हा आर्थिक भार सोसायटीधारकांवर पडण्याची शक्यता असल्याने विकासकाकडूनच शुल्काची वेळेत वसुली करण्याची कायदेशीर व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या पुनर्वापराबाबतही फेडरेशनने प्रश्न उपस्थित केला आहे. अपेक्षित पुनर्वापर ५० टक्के असताना प्रत्यक्ष पुनर्वापर सुमारे ३० टक्के असल्यास ही तफावत का निर्माण झाली, याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच ५० टक्क्यांपेक्षा अधिक पुनर्वापर करणाऱ्या सोसायट्यांना शुल्कात सवलत देऊन पर्यावरणपूरक कामाला प्रोत्साहन द्यावे, अशी भूमिका फेडरेशनने घेतली आहे.

फेडरेशनने प्रस्तावाचा पुनर्विचार करून शुल्करचनेत स्पष्टता, विकासकाची जबाबदारी, नियमांचे पालन करणाऱ्या सोसायट्यांना प्रोत्साहन आणि शुल्कातून जमा होणाऱ्या निधीचा पारदर्शक वापर याबाबत स्पष्ट तरतुदी करण्याची मागणी केली आहे.

“पर्यावरण संरक्षणाला आमचा विरोध नाही. STP व्यवस्थित चालले पाहिजेत आणि प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर वाढलाच पाहिजे. मात्र पर्यावरणाच्या नावाखाली सोसायटीधारकांवर आर्थिक बोजा टाकणारे धोरण आम्हाला मान्य नाही. एकाच सेवेसाठी दुहेरी शुल्क आकारू नये, विकासकाची जबाबदारी सोसायटीवर ढकलू नये आणि नागरिकांकडून घेतलेल्या प्रत्येक रुपयाचा पारदर्शक हिशेब द्यावा. सदर विषय सध्याच्या स्वरूपात मंजूर करू नये; अन्यथा फेडरेशनच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.”

– संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी-चऱ्होली पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button