टिटवाळ्यात विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे!
बनावट लिंक, OTP फसवणूक, फोटो मॉर्फिंगसह ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन

टिटवाळा, मुंबई | वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा आणि सुरक्षित इंटरनेट वापराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिटवाळा येथील प्रगती महाविद्यालयात सायबर क्राईम जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. ठाणे जिल्हा कृषी शिक्षण प्रसारक मंडळ आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या सत्राला अंकित इंग्लिश स्कूल, टिटवाळा येथील विद्यार्थ्यांसह अन्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रगती महाविद्यालयातील रितेश कदम आणि धनेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार, त्यामागील कार्यपद्धती आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.
हेही वाचा
भटके विमुक्त दिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा
बनावट लिंक, OTP फसवणूक, फोटो मॉर्फिंग, व्हिडिओ कॉल स्कॅम, पासवर्ड चोरी, मालवेअर यांसह ऑनलाइन जगतातील विविध सायबर धोक्यांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या लिंकवर क्लिक न करणे, OTP किंवा पासवर्ड कोणाशीही शेअर न करणे तसेच सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करताना आवश्यक खबरदारी घेणे, याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे नसून सतर्कता आणि जबाबदार डिजिटल वर्तनही तितकेच महत्त्वाचे आहे, असा संदेश या सत्रातून देण्यात आला. संवादात्मक पद्धतीने झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाला क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर, सहसंचालक अजय शिर्क तसेच सदस्य गायत्री केसरकर आणि दिपू सिंग यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, सुरक्षित इंटरनेट वापर आणि डिजिटल फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. डिजिटल युगात वाढत्या ऑनलाइन धोक्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच सायबर सुरक्षेची जाणीव निर्माण करण्यासाठी अशा जनजागृती उपक्रमांची गरज अधोरेखित झाली.





