नूतन अभियांत्रिकी महाविद्यालय आणि रोटरी क्लब तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पॉक्सो/पॉश कायदा २०१३’ कार्यशाळा संपन्न

तळेगाव दाभाडे | रोटरी क्लब तळेगाव दाभाडे आणि नूतन अभियांत्रिकी यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील सुरेशभाई शहा हॉलमध्ये ‘पॉश कायदा २०१३’ (कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण) या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या सत्रात ॲड. शुभांगी परुळेकर यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रास्ताविक भूमिका मांडताना अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रमोद पाटील यांनी अशा कायदेशीर मार्गदर्शन सत्रांची कार्यस्थळावरील उपयुक्तता अधोरेखित केली. त्यानंतर रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष प्रमोद दाभाडे यांनी रोटरी क्लबच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.

हेही वाचा
फलटण उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या; माजी मंत्र्यांच्या ओएसडीवर गंभीर आरोप
प्रमुख वक्त्या ॲड. शुभांगी परुळेकर यांनी दैनंदिन कामकाजात पॉश कायदा (POSH Act) समजून घेण्याचे महत्त्व स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, “कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि निकोप वातावरण तयार करण्यासाठी हा कायदा केवळ महिलांनीच नव्हे, तर पुरुषांनीही नीट समजून घेणे तितकेच आवश्यक आहे.” त्यांनी कायद्यातील विविध तरतुदी आणि त्यासंबंधित प्रक्रिया सोप्या भाषेत समजावून सांगितल्या.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व आभार प्रदर्शन अंतर्गत तक्रार समितीच्या (ICC) प्रमुख डॉ. नीता कराडकर यांनी केले. या कार्यक्रमास रोटरी क्लबचे सचिव चेतन नामजोशी, प्रकल्पप्रमुख ॲड. अभिषेक गोडांबे, सीएसआर डायरेक्टर गिरीश जोशी, रो. धनंजय मथुरे, फर्स्ट लेडी वैशाली दाभाडे यांच्यासह रोटरी क्लबचे अन्य सदस्य व महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.




