TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांची ठाम भूमिका; सरकारसोबत चर्चेतून तोडगा काढण्याची अपेक्षा

५८ लाख नोंदींच्या मुद्द्यावर स्पष्टता देण्याची मागणी; मराठा समाजाच्या हक्कांसाठी आंदोलन सुरू ठेवण्याचा जरांगेंचा निर्धार

Manoj Jarange Patil on Eknath Shinde : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असून, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काही दिवसांपासून जरांगे पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या इशाऱ्यावर आंदोलन करत असल्याचे आरोप केले जात होते. मात्र, आता जरांगे यांनी थेट शिंदे यांच्यावरच निशाणा साधल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

मराठा समाजाच्या कुणबी नोंदींच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला. “५८ लाख नोंदी सापडलेल्या नाहीत, तर एकनाथ शिंदेंनी स्पष्ट करावं किंवा देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं की अशा ५८ लाख नोंदी सापडलेल्या नाहीत,” असे ते म्हणाले.

“५८ लाख नोंदी सापडल्या आहेत, हे शिंदे यांनी स्पष्ट करावे. भाजपने अशा पद्धतीने नोंदी कमी केल्या तर मराठे एकनाथ शिंदेंना संपवून टाकतील,” अशी आक्रमक प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली. पक्षाशी ज्या पद्धतीने गद्दारी केली, तशी आमच्याशी गद्दारी का केली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

एकनाथ शिंदे यांच्या परभणी दौऱ्यावरूनही जरांगे पाटील यांनी टीका केली. शिंदे यांनी सुरुवातीला परभणी दौरा रद्द केला होता. मात्र, काही वेळाने ‘जरांगे पाटलांनी सूट दिली आहे’ असा संदेश मिळाल्यानंतर त्यांनी दौरा केल्याचा दावा जरांगे यांनी केला.

हेही वाचा – हिंजवडी-मान-मारुंजी-महाळुंगे पट्ट्यात रस्ते अपघातांचा वाढता विळखा; २०२५ मध्ये सर्वाधिक १५ बळी

“आम्ही जर भिडलो असतो तर शिंदे साहेबांना पळायला सुद्धा जागा राहिली नसती,” असा दावा करत त्यांनी शिंदे यांच्या दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेची दारं खुली असल्याचे म्हटल्याच्या वक्तव्यावरही जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे, असं आम्ही म्हटलं नाही. आम्ही तुम्हाला मोजत नाही, आम्ही मोकळे आहोत,” असे ते म्हणाले.

संविधानिक शब्दाच्या वापरावरूनही जरांगे यांनी सरकारवर निशाणा साधला. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले लोक भाजपमध्ये असूनही ते संविधानिक मानले जातात, तर आरोप नसलेले लोक तुरुंगात आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

एकनाथ शिंदे यांच्या सभांवरूनही जरांगे पाटील यांनी टीका केली. पूर्वी शिंदे यांच्या सभांना मोठी गर्दी होत होती, मुख्यमंत्र्यांपेक्षाही मोठ्या सभा होत होत्या. मात्र, “मराठ्यांच्या विरोधात गेल्यानंतर काय होतं बघा,” असे म्हणत शिंदे यांच्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी भाष्य केले.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील आणि सत्ताधाऱ्यांमधील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होताना दिसत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button