रत्नागिरीत 2,159 कोटींची गुंतवणूक; 2,426 रोजगारांची निर्मिती, पंचतारांकित हॉटेलसह मोठे प्रकल्प
जिल्हा गुंतवणूक परिषदेत 62 उद्योग घटकांशी सामंजस्य करार; स्टील, सेमीकंडक्टर आणि प्रदूषणमुक्त एमआयडीसी प्रकल्पांना मिळणार गती

रत्नागिरी : ‘कोकणात उद्योग येत नाहीत’ हा जुना समज पुसून काढत रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक उद्योजकांनी औद्योगिक आणि पर्यटन विकासाला नवी दिशा दिली आहे. ‘जिल्हा गुंतवणूक परिषद 2026’ मध्ये 62 उद्योग घटकांशी तब्बल 2,159.37 कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoU) करण्यात आले. या गुंतवणुकीतून 2,426 रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. यामध्ये पर्यटन क्षेत्राला चालना देणाऱ्या 100 कोटी रुपयांच्या पंचतारांकित हॉटेल प्रकल्पासह विविध मोठ्या औद्योगिक प्रकल्पांचा समावेश आहे.
एक्सप्रेस ग्रुपचे 100 कोटींचे पंचतारांकित हॉटेल
रत्नागिरीच्या पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला बळ देण्यासाठी एक्सप्रेस ग्रुपकडून 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करून पंचतारांकित हॉटेल उभारण्यात येणार आहे. विमानतळापासून सुमारे 2 किलोमीटर, शहरापासून 3 किलोमीटर आणि समुद्रापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर एमआयडीसीच्या जागेत हा प्रकल्प उभारला जाणार आहे.
दरम्यान, जयगड येथे आनंद महिंद्रा यांच्या पंचतारांकित हॉटेलचे सुमारे 90 टक्के काम पूर्ण झाले असून, हे हॉटेल लवकरच उद्घाटनासाठी सज्ज होणार आहे.
रत्नागिरी विमानतळावरून लवकरच प्रवासी विमानसेवा
रत्नागिरी विमानतळाचे सुमारे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ‘एटीआर’ प्रवासी विमानसेवा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. विमानसेवा सुरू झाल्यास जिल्ह्यातील पर्यटन आणि उद्योग क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.
‘पुढील वर्षी 5 हजार कोटींची गुंतवणूक’
उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी रत्नागिरीतील स्थानिक उद्योजकांचे कौतुक केले. रत्नागिरीचा जीडीपी गेल्या 20 वर्षांच्या तुलनेत अनेक पटींनी वाढला असून, त्यामध्ये स्थानिक उद्योजक, व्यापारी आणि दुकानदारांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक उद्योजकांनी पुढाकार घेऊन 2,159 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हे सर्व प्रकल्प 100 टक्के पूर्ण करून पुढील वर्षी 5 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा नवा संकल्प पूर्ण करू, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – बालकांच्या अॅनिमियावर तातडीने उपाययोजना करा; मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचे निर्देश
स्टील उद्योगातून 10 ते 12 हजार रोजगारांची अपेक्षा
जिल्ह्यात रोजगारनिर्मितीला मोठी चालना देणाऱ्या विविध प्रकल्पांची घोषणाही यावेळी करण्यात आली. स्टील उद्योगासाठी येत्या 7, 8 आणि 9 तारखेला महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण होऊन जिल्ह्यातील स्टील उद्योगाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे सांगण्यात आले. या उद्योगामुळे किमान 10 ते 12 हजार स्थानिकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे.
तसेच ‘व्हीआयटी’कडील जमीन काढून ती ‘आरआरपी’ या सेमीकंडक्टर कंपनीला देण्यात येत आहे. निवेंडी, वाटद आणि मेर्वी येथे प्रदूषणमुक्त एमआयडीसी उभारण्याच्या प्रक्रियेलाही गती देण्यात आली आहे.
‘मिलाप’ ॲपमुळे एमआयडीसीच्या जागेसाठी घरबसल्या ऑफर लेटर
उद्योगांसाठी एमआयडीसीची जागा मिळविण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी ‘मिलाप’ ॲप सुरू करण्यात आले आहे. सोमवारी वैध अर्ज केल्यास पुढील सोमवारी घरबसल्या थेट ऑफर लेटर मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
‘मैत्री’ पोर्टलवर अर्ज केल्यानंतर 30 दिवसांत दाखला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. निर्धारित वेळेत कार्यवाही न झाल्यास अधिकार आयुक्तांकडे जातील आणि पुढील 8 दिवसांत मंजुरी देण्याची तरतूद असल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले.
‘नोकरी मागणारे नको, नोकरी देणारे बना’
तरुणांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आणि केंद्राच्या विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊन स्वतःचे उद्योग व स्टार्टअप सुरू करावेत. तरुणांनी केवळ नोकरी मागणारे न राहता नोकरी देणारे उद्योजक बनावे, असे आवाहन डॉ. उदय सामंत यांनी केले.
राज्यातील 17 जिल्ह्यांत 82,655 कोटींची गुंतवणूक
राज्यस्तरावर 30 ऑगस्ट 2026 पर्यंत महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांमध्ये 1,837 गुंतवणूक करारांद्वारे 82,655 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. या माध्यमातून 1,55,389 रोजगार निर्माण होणार आहेत. आगामी काळात उर्वरित जिल्ह्यांमध्येही जिल्हा गुंतवणूक करार परिषदांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यातून राज्यात आणखी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे.
रत्नागिरी जिल्हा गुंतवणूक परिषदेत झालेल्या 62 सामंजस्य करारांमुळे 2,159.37 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 2,426 रोजगारांची निर्मिती होणार असल्याने जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.




