Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या विकासाला गती; आफ्रिकन सफारीच्या कामांचा मुख्यमंत्री फडणवीस यांचेकडून आढावा

कामांसाठी नव्याने कालमर्यादा निश्चित करण्याचे निर्देश; ताडोबा-पेंचसोबत गोरेवाडा पर्यटन सर्किट विकसित करण्यावर भर

नागपूर : हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरेवाडा प्रकल्पाची पाहणी करून विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला. आफ्रिकन सफारी सुरू करण्यासाठी सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती, प्रकल्पाची प्रगती आणि सफारी सुरू करण्याचे अपेक्षित वेळापत्रक याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. गोरेवाड्यातील सर्व कामांसाठी नव्याने स्पष्ट कालमर्यादा निश्चित करून त्यानुसार कामांना गती देण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले.

गोरेवाडा येथील वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील वसंतराव नाईक प्रशासकीय इमारतीत आयोजित आढावा बैठकीत वनमंत्री गणेश नाईक, खासदार माया इनवाते, वनविभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक एम. श्रीनिवास राव यांच्यासह वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आफ्रिकन सफारीच्या कामांना गती

गोरेवाडा प्रकल्पातील विविध कामांची माहिती घेताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आफ्रिकन सफारी हा प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असून, त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि इतर कामे कोणत्या टप्प्यावर आहेत, याची माहिती त्यांनी घेतली.

आफ्रिकन सफारी सुरू करण्यासाठी आवश्यक कामे निश्चित करून ती कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत. सफारी कधी सुरू करता येईल, याबाबतचे अपेक्षित वेळापत्रक निश्चित करून कामांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

2021 मध्ये पूर्ण झाला पहिला टप्पा

वनविभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी गोरेवाडा प्रकल्पाची सद्यस्थिती आणि सुरू असलेल्या कामांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. प्रकल्पाचा पहिला टप्पा 2021 मध्ये पूर्ण करण्यात आला असून, त्यात वाइल्डलाइफ रेस्क्यू सेंटर, इंडियन सफारी आणि एंट्रन्स प्लाझा यांचा समावेश आहे.

प्रकल्पाच्या पुढील विकासासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात विविध सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात वॉकिंग ट्रेल, आफ्रिकन सफारी, सफारी प्लाझा, अॅनिमल हॉस्पिटल आणि क्वारंटाईन ब्लॉक यांचा समावेश आहे.

हेही वाचा –  रत्नागिरीत 2,159 कोटींची गुंतवणूक; 2,426 रोजगारांची निर्मिती, पंचतारांकित हॉटेलसह मोठे प्रकल्प

तिसऱ्या टप्प्यात नाईट झू आणि गोंडवाना पार्क

प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात ट्रेल ऑफ सेन्सेस, बायोपार्क, नाईट झू, गोंडवाना पार्क, बायो डिस्कव्हरी प्लाझा आणि ट्रायबल ट्रेल यांचा समावेश आहे. या सुविधांच्या माध्यमातून गोरेवाड्याचा विकास केवळ वन्यजीव पर्यटनापुरता मर्यादित न ठेवता जैवविविधता, निसर्ग आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभव देणारे महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून करण्याची संकल्पना आहे.

प्रकल्पाच्या पुढील विकासासाठी अनुभवी आणि सक्षम सल्लागाराची नियुक्ती करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. दीर्घकालीन पर्यटनाच्या गरजा लक्षात घेऊन गोरेवाड्याचे नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

ताडोबा-पेंचसोबत पर्यटन सर्किटचा विचार

ताडोबा आणि पेंच येथे येणाऱ्या पर्यटकांनी गोरेवाड्यात एक ते दोन दिवस मुक्काम करून पर्यटन करावे, अशा पद्धतीने गोरेवाड्याचा विकास करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

ताडोबा आणि गोरेवाडा या दोन्ही पर्यटनस्थळांना जोडणारे प्रभावी नियोजन करून पर्यटकांचा मुक्काम वाढविण्यासाठी आवश्यक सुविधा विकसित कराव्यात, असे त्यांनी सांगितले. वन्यजीव पर्यटनासोबत पर्यटकांना विविध अनुभव देणाऱ्या सुविधा निर्माण करून गोरेवाड्याची विदर्भातील महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाची प्रत्यक्ष पाहणी करून विविध सुविधांची आणि सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली. प्रकल्पाच्या पुढील विकासासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही त्यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button