एकनाथ शिंदेंच्या भाषणाला सुरुवात होताच ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; म्हणाले, ‘हे तर आपलेच लोक’
परभणीतील शेतकरी-युवा संवाद मेळाव्यात घोषणाबाजी; ‘राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकरी, युवक आणि लाडक्या बहिणींचा’

परभणी : परभणीत आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी व युवा संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणासाठी उभे राहताच काही जणांनी ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा दिल्या. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या भाषणाला सुरुवात होताच घोषणाबाजी झाल्याने काही काळ वातावरण तापले.
घोषणाबाजी करणारे लोक आपलेच आहेत, त्यांना मंचावर बोलवावे, अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या. तसेच पोलिसांनीही ‘आपल्याच लोकांना साइडला थांबू द्या,’ असे सांगितले. त्यामुळे काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आली.
‘बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे नेत आहोत’
मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात अशा मोठ्या सभा होत असत. त्याच धर्तीवर आज शिवसेनेची विराट सभा होत आहे. सर्वांचे स्वागत करत आपण बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले.
रक्षाबंधनाच्या आठवणी सांगताना शिंदे म्हणाले की, हजारो लाडक्या बहिणी रक्षाबंधनासाठी आल्या होत्या. आजही अनेक बहिणींनी आपल्याला राखी बांधली. ‘मी विरोधी पक्षनेता होतो, मुख्यमंत्री होतो आणि आता उपमुख्यमंत्री आहे; पण सगळ्यात मोठी पदवी म्हणजे महाराष्ट्रात मी लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून ओळखला जातो,’ असे शिंदे म्हणाले.
हेही वाचा – ‘अभिजीत दिपके आणि सहकाऱ्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत’; सोनम वांगचुक यांचा मोठा खुलासा
‘राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा’
मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारकडूनही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
‘बळीराजा संकटात असेल, तेव्हा सरकार तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहील. राज्य सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा, युवकांचा आणि लाडक्या बहिणींचा आहे,’ असे शिंदे म्हणाले.
‘सहा वाघ पुन्हा खऱ्या शिवसेनेत आले’
महाराष्ट्रात 2022 मध्ये उठाव झाला आणि चार वर्षांनंतर पुन्हा एकदा राजकीय उठाव झाल्याचे शिंदे यांनी म्हटले. ‘षटकार मारणारे सहा वाघ पुन्हा खऱ्या शिवसेनेत आले आहेत,’ असे म्हणत त्यांनी शिवसेनेत दाखल झालेल्या नेत्यांचे कौतुक केले.
बंडू जाधव हे डॅशिंग खासदार असून त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे. परभणीच्या विकासासाठी सुमारे 110 कोटी रुपयांचा निधी उभा करण्यात आल्याचा दावा शिंदे यांनी केला. परभणीसाठी जे काही करता येईल, ते सरकार केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
विरोधी पक्षात राहून विकास करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने बंडू जाधव खऱ्या शिवसेनेत आले, असा दावाही शिंदे यांनी केला.
‘डबल इंजिन सरकार विकास करून दाखवेल’
डबल इंजिनचे सरकार विकास केल्याशिवाय राहणार नाही, असा शब्द शिंदे यांनी परभणीकरांना दिला. बंडू जाधव यांनी घेतलेला निर्णय शेतकरी आणि युवकांच्या हितासाठी तसेच त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी घेतल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या योजना राबवण्यासाठी सरकार पूर्णपणे साथ देईल, असे आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.





