TOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

दुखापतीनंतर नीरज चोप्राचा मोठा निर्णय; आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार

सरावादरम्यान घोट्याचे लिगामेंट फाटले; डायमंड लीग फायनललाही मुकणार, जेतेपदाच्या बचावाची संधी हुकली

नवी दिल्ली : भारताचा स्टार भालाफेकपटू आणि दोन वेळचा ऑलिम्पिक पदकविजेता नीरज चोप्रा दुखापतीमुळे २०२६ च्या उर्वरित हंगामातून बाहेर पडला आहे. सरावादरम्यान त्याच्या घोट्याचे लिगामेंट फाटल्याने त्याने या हंगामातील आगामी सर्व स्पर्धांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसह डायमंड लीग फायनलमध्येही नीरज खेळताना दिसणार नाही.

नीरजने २९ ऑगस्ट रोजी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे आपल्या दुखापतीची माहिती दिली. डॉक्टर आणि आपल्या टीमसोबत चर्चा केल्यानंतर उर्वरित हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले.

लॉझेनमध्ये नोंदवली होती मोसमातील सर्वोत्तम कामगिरी

दीर्घ विश्रांतीनंतर नीरजने जूनमध्ये दोहा डायमंड लीगमधून पुनरागमन केले होते. या स्पर्धेत त्याने ८५.६९ मीटर भालाफेक करत चौथे स्थान मिळवले. त्यानंतर ग्लासगोमध्ये ८५.८३ मीटरची फेक करत त्याने रौप्यपदक पटकावले. लॉझेन डायमंड लीगमध्ये त्याने यंदाची सर्वोत्तम कामगिरी नोंदवत आपली लय पुन्हा मिळवत असल्याचे संकेत दिले होते.

मात्र, सरावादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे त्याचा २०२६ मधील हंगाम अचानक संपला आहे.

हेही वाचा –  आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते कै. राहुल साबळे यांच्या कुटुंबाला ५ लाखांची मदत

आशियाई क्रीडा स्पर्धेत जेतेपदाचा बचाव हुकला

जपानमधील आयची-नागोया येथे १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत आपल्या जेतेपदाचा बचाव करण्याची संधी नीरजला मिळणार होती. मात्र, दुखापतीमुळे आता तो या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. नीरजच्या अनुपस्थितीचा भारताच्या भालाफेक संघाला मोठा फटका बसला आहे.

डायमंड लीग फायनलच्या शर्यतीतही धक्का

नीरज डायमंड लीगच्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर होता आणि अंतिम फेरीच्या शर्यतीत कायम होता. मात्र, दुखापतीमुळे त्याला डायमंड लीग फायनललाही मुकावे लागणार आहे.

नीरजच्या अनुपस्थितीत रोहित यादवकडे अपेक्षा

नीरजच्या माघारीनंतर आता भारताच्या भालाफेकमध्ये रोहित यादवकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. रोहितने नुकतेच भुवनेश्वर येथे झालेल्या वर्ल्ड ॲथलेटिक्स सिल्व्हर लेव्हल कंटिनेंटल टूरमध्ये ८७.६८ मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे आगामी स्पर्धांमध्ये नीरजची उणीव भरून काढण्याची मोठी जबाबदारी रोहितवर असणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button