नेपाळ पूरग्रस्त भागातून महाराष्ट्रातील १४२ पर्यटक सुखरूप परतले; ३३८ नागरिकांशी संपर्क
४०४ महाराष्ट्रातील पर्यटक नेपाळमध्ये अडकले; नागपूरचे १०५ जण मायदेशी, ६६ पर्यटकांशी संपर्क अद्याप नाही

मुंबई : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पूर आणि भूस्खलनामुळे महाराष्ट्रातील ४०४ पर्यटक अडकले आहेत. त्यापैकी ३३८ नागरिकांशी संपर्क प्रस्थापित झाला असून ते सुरक्षित असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. दरम्यान, शनिवारी संध्याकाळपर्यंत १४२ पर्यटक महाराष्ट्रात सुखरूप परतले आहेत.
नागपूरमधील १०५ पर्यटक महाराष्ट्रात परतले असून, सागा (मानसरोवरजवळ) येथून ३७ पर्यटक शनिवारी इंडिगोच्या 6E 1158 विमानाने मुंबईत दाखल झाले. त्यामुळे पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्याच्या प्रयत्नांना यश मिळत आहे.
६६ पर्यटकांशी अद्याप संपर्क नाही
शनिवारी सकाळी १० वाजेपर्यंत नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची संख्या ४०४ होती. त्यापैकी ३३८ जणांशी संपर्क साधण्यात आला आहे. मात्र, ६६ पर्यटकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही.
रिचा टूर्स प्रा. लि. या संस्थेमार्फत नेपाळला गेलेल्या ६० पर्यटकांशी अद्याप संपर्क झालेला नाही. याशिवाय आणखी सहा नागरिकांची माहिती लिंकद्वारे प्राप्त झाली असून त्यांच्याशीही संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा – दुखापतीनंतर नीरज चोप्राचा मोठा निर्णय; आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार
चीन-तिबेटमधील १४९ भारतीयांची यादी मिळाली
दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाकडून चीन-तिबेट प्रदेशात असलेल्या १४९ भारतीय नागरिकांची यादी राज्याला प्राप्त झाली आहे. या यादीतील नागरिक महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील असल्याने त्यांची माहिती पडताळण्याचे आणि संबंधितांशी संपर्क साधण्याचे काम राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सुरू आहे.
भोटेकोशी नदीच्या पुरामुळे मोठे नुकसान
तिबेटमधून नेपाळमध्ये आलेल्या पुराने रौद्ररूप धारण केले आहे. रसुवा जिल्ह्यातील भोटेकोशी नदीला आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेक नागरिक वाहून गेले आहेत. अनेक घरे कोसळली असून पूरग्रस्त भागात बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू आहे.
महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे राज्यात परत आणण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असून, संपर्क होऊ न शकलेल्या नागरिकांची माहिती मिळवण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.





