मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांचे स्वागत केले. सुनेत्रा पवार यांनी अमित शाह यांना राखी बांधली. कार्यक्रमानंतर दिल्लीला रवाना होत असताना मुंबई विमानतळावर अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुमारे दहा मिनिटे एकांतात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीची चर्चा
सूत्रांच्या माहितीनुसार, अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीत राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. विशेषतः शिवसेनेतील काही मंत्री नाराज असल्याची चर्चा असून, मंत्र्यांमधील असंतोषाबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी शिंदे यांना ‘चिंता करू नका’ असे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
हेही वाचा – भावंड नसलेल्या कर्मचाऱ्यांसाठी व्हीटीपी रिअल्टीचा खास उपक्रम
मराठीच्या मुदतवाढीवरून वादाची ठिणगी?
राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला होता. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात आदेश जारी केले होते. चालकांना मराठी शिकण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती.
मुदत संपल्यानंतर मराठी भाषेचे प्रमाणपत्र नसलेल्या किंवा मराठी बोलता न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाईलाही सुरुवात झाली होती. या निर्णयामुळे परप्रांतीय चालकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
फडणवीसांचा मोठा निर्णय; आणखी वर्षाची मुदत
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली असून, काही मंत्री अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांची विमानतळावरील भेट महत्त्वाची मानली जात आहे. मराठी भाषा नियम, त्यावरील मुदतवाढ आणि शिवसेना मंत्र्यांमधील कथित नाराजी या मुद्द्यांवर या भेटीत चर्चा झाली का, याबाबत आता राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने झालेल्या या छोटेखानी भेटीने महायुतीतील राजकीय समीकरणांबाबत चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे.




