Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबईराजकारण

शिक्षक भरतीला मोठी गती; पवित्र पोर्टलवरून १३ हजार ११९ उमेदवारांची शिफारस

TAIT-2025 च्या गुणवत्ताधारित प्रक्रियेत निवड; नव्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची अपेक्षा : मंत्री दादाजी भुसे

मुंबई : पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय निवड प्रकारासाठी १३ हजार ११९ पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन करून त्यांच्या भावी शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळा, महानगरपालिका, नगरपालिका, शासकीय विद्यानिकेतन तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT-2025) घेण्यात आली होती. या प्रक्रियेतील मुलाखतीशिवाय निवड प्रकाराची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून विविध व्यवस्थापनांमधील १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.

‘विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची महत्त्वाची जबाबदारी’

गुणवत्तेच्या आधारे पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांवर विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची महत्त्वाची जबाबदारी आहे, असे मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करताना विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, कौशल्ये आणि मूल्यांची जडणघडण करण्यासाठी शिक्षकांनी समर्पित भावनेने काम करावे. राज्यातील शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी नव्याने निवड झालेल्या शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा –  मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेला गती; अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्याचे नितेश राणेंचे निर्देश

लॉगिनवर निवडीची माहिती; एसएमएसद्वारेही कळविले

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि गुणवत्ताधिष्ठित पद्धतीने राबविण्यात येत आहे. शिफारस झालेल्या उमेदवारांना त्यांच्या लॉगिनवर निवडीची स्थिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांना एसएमएसद्वारेही निवडीची माहिती कळविण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

जिल्हा परिषदांमध्ये सर्वाधिक ८,४८१ पदांची शिफारस

व्यवस्थापननिहाय शिफारस झालेल्या पदांची संख्या पुढीलप्रमाणे आहे :

जिल्हा परिषद : ८,४८१

महानगरपालिका : १,३०६

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळा : १,६०१

खासगी शैक्षणिक संस्था : १,४५१

नगरपालिका/परिषदा : २२६

शासकीय विद्यानिकेतन : ५४

इयत्तानिहाय पदसंख्या

इयत्ता १ ली ते ५ वी : ७,५४१

इयत्ता ६ वी ते ८ वी : ४,२०७

इयत्ता ९ वी ते १० वी : १,११९

इयत्ता ११ वी ते १२ वी : २५२

अशा प्रकारे एकूण १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button