Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेला गती; अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्याचे नितेश राणेंचे निर्देश

तालुका आणि गावपातळीवर विशेष शिबिरे; प्रलंबित प्रस्तावांवर कालमर्यादेत निर्णय घेण्याच्या सूचना

मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची प्रभावी आणि गतिमान अंमलबजावणी करून अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. योजनेच्या विभागीय स्तरावरील अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीत जिल्हानिहाय योजनेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यातील योजनेची सद्यस्थिती, मंजूर प्रकरणे, लाभार्थ्यांची संख्या, प्रलंबित प्रस्ताव, मत्स्यतलावांची उपलब्धता तसेच अंमलबजावणीतील अडचणींबाबत माहिती घेण्यात आली.

ज्या जिल्ह्यांमध्ये योजनेची प्रगती अपेक्षेप्रमाणे झालेली नाही, त्या ठिकाणच्या कारणांचा शोध घेऊन तातडीने सुधारात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना मंत्री राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

गावपातळीवर विशेष शिबिरांचे आयोजन

योजनेतील लाभार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी तालुका आणि गावपातळीवर विशेष शिबिरे आयोजित करावीत, असे मंत्री राणे यांनी सांगितले. या शिबिरांमधून मत्स्यव्यवसायिक, मत्स्यशेतकरी, महिला बचतगट, युवक तसेच मत्स्यव्यवसायाशी संबंधित उद्योजकांना योजनेची सविस्तर माहिती देण्यात यावी.

योजनेची पात्रता, उपलब्ध घटक, अनुदानाचे स्वरूप, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करून अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना योजनेशी जोडण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

मत्स्यतलावांची संख्या अधिक असलेल्या भागांमध्ये नियोजनबद्ध जनजागृती मोहीम राबवून योजना तळागाळापर्यंत पोहोचवावी. तसेच अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करून पात्र लाभार्थ्यांना वेळेत मार्गदर्शन आणि तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  गणेशोत्सवात भाविकांना शुद्ध प्रसादाचा संकल्प; मंडळांनी अन्नसुरक्षा नियम पाळावेत : मुख्यमंत्री फडणवीस

प्रलंबित प्रस्तावांवर तातडीने निर्णय

योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या प्रशासकीय, तांत्रिक आणि आर्थिक अडचणी तातडीने दूर कराव्यात. प्रलंबित प्रस्तावांचा नियमित आढावा घेऊन त्यावर निश्चित कालमर्यादेत निर्णय घेण्याचे निर्देशही मंत्री राणे यांनी दिले.

लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ वेळेत मिळण्यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मत्स्यव्यवसायाला चालना, रोजगारनिर्मितीवर भर

मत्स्यव्यवसायाला चालना देणे, मत्स्य उत्पादन वाढविणे, ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक बळकट करणे, या उद्देशाने मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची प्रभावी अंमलबजावणी महत्त्वाची असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी नमूद केले.

बैठकीस मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार तसेच सर्व प्रादेशिक उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button