गणेशोत्सवात भाविकांना शुद्ध प्रसादाचा संकल्प; मंडळांनी अन्नसुरक्षा नियम पाळावेत : मुख्यमंत्री फडणवीस
गणेशोत्सव-२०२६ साठी सरकारची विशेष तयारी; परवानग्या, रस्ते, सुरक्षा आणि विसर्जन व्यवस्थेवर समन्वयाने काम करण्याचे निर्देश

मुंबई : महाराष्ट्राचा राज्य उत्सव असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात मंडळांमार्फत भाविकांना देण्यात येणारा प्रसाद शुद्ध, सुरक्षित आणि भेसळमुक्त असावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. प्रसादाच्या गुणवत्तेसाठी आवश्यक किमान निकषांची माहिती करून घेऊन मंडळांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सव-२०२६ निमित्त कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध विभागांना आवश्यक निर्देश दिले.
‘राज्य उत्सवाची शिस्त आणि पावित्र्य जपा’
मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी उत्सवाला दिलेले व्यापक स्वरूप कौतुकास्पद असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून मांडलेला सामाजिक अभिसरण आणि प्रबोधनाचा विचार राज्यभर पुढे नेणे आवश्यक आहे.
गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्याने त्याची परंपरा जपत शिस्त आणि पावित्र्य राखण्याची जबाबदारी नागरिक, प्रशासन, गणेशोत्सव मंडळे आणि विविध संघटनांची असल्याचे त्यांनी सांगितले.
परवानग्या जलदगतीने देण्याच्या सूचना
गणेशोत्सव उत्साहपूर्ण आणि उत्तम पद्धतीने पार पडण्यासाठी प्रशासन, गणेशोत्सव मंडळे आणि समन्वय समित्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे. आयोजनातील त्रुटी दूर करून मंडळांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये गणेशोत्सवासाठी गेल्या अनेक वर्षांत संरचित व्यवस्था निर्माण झाली आहे. मात्र, दरवर्षी उद्भवणाऱ्या नव्या अडचणी ओळखून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
गणेशोत्सव मंडळांच्या परवानग्यांचे प्रश्न प्रलंबित राहू नयेत. जुन्या मंडळांच्या बहुतांश परवानग्या नियमित स्वरूपाच्या असल्याने प्रशासनाने सक्रिय पुढाकार घेऊन त्या जलदगतीने मंजूर कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
हेही वाचा – नेपाळमधील महाराष्ट्राच्या पर्यटकांसाठी सरकारचा ‘अलर्ट मोड’
खड्डेमुक्त मार्ग आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था
गणेशमूर्तींच्या आगमन आणि विसर्जनाचे मार्ग सुस्थितीत ठेवावेत. या मार्गांवर खड्डे राहणार नाहीत आणि रात्री पुरेशी प्रकाशव्यवस्था उपलब्ध असेल, याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम १४३ नुसार ट्रस्टच्या नावावर असलेल्या कार्यालयांसाठी मालमत्ता करमाफीची तरतूद आहे. यासाठी संबंधित गणेशोत्सव मंडळांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
नियमभंगावर कठोर कारवाई
फटाके, लाऊडस्पीकर आणि इतर बाबींमध्ये होणाऱ्या नियमभंगावर पोलिसांनी लक्ष ठेवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी. गणेशोत्सवाचे पावित्र्य आणि शिस्त कायम राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
गणेशमूर्तींच्या मिरवणुकीदरम्यान सर्व मंडळांनी सुरक्षिततेच्या उपाययोजनांची पुन्हा पडताळणी करावी. विशेषतः मोठ्या मूर्ती असलेल्या मंडळांना आवश्यक सूचना देऊन सर्व व्यवस्था सुरक्षित असल्याची खात्री करावी. यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
पीओपीच्या मूर्तींच्या विसर्जनामुळे समुद्र किंवा नदीपात्रात प्रदूषण होणार नाही, यासाठी योग्य प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती शासनाने उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याचेही त्यांनी सांगितले.
‘शांतता आणि उत्साहात गणेशोत्सव साजरा करा’ : एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सव उत्साह, शिस्त आणि सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी शासन, प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन केले.
गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जन सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने होण्यासाठी पोलीस, महापालिका आणि संबंधित विभागांनी नियोजन केले असून मंडळांच्या सूचनांचाही त्यात समावेश करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईतील सुमारे १ हजार ८५० किलोमीटर लांबीचे रस्ते काँक्रीटचे झाले असून, गणेशमूर्तींच्या आगमन आणि विसर्जन मार्गांवर खड्डे राहणार नाहीत, याची महापालिका प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्याचे शिंदे यांनी नमूद केले. गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांची परवानगी देण्याबाबतही कार्यवाही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन
सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे. कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास तातडीने पोलीस किंवा संबंधित प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
मोठ्या गणेशमूर्तींची वाहतूक करताना मूर्तीची रचना, नट-बोल्ट, वेल्डिंग आणि अन्य जोडणी सुरक्षित असल्याची खात्री करावी. आगमन आणि विसर्जनावेळी लहान मुले तसेच भाविकांना मूर्तीपासून सुरक्षित अंतरावर ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, गृह राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, पोलीस महासंचालक सदानंद दाते तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.





