दिघीच्या ज्ञानदीप बालगृहात डॉ. डी. वाय. पाटील आकुर्डीच्या NSS स्वयंसेवकांचा रक्षाबंधन सोहळा; शैक्षणिक साहित्याचे वाटप

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :
सामाजिक बांधिलकी आणि आपुलकीचा संदेश देत डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी येथील NSS Unit A-106 च्या स्वयंसेवकांनी दिघी येथील ‘ज्ञानदीप बालगृहात’ रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. ५८ NSS स्वयंसेवकांच्या सहभागाने रंगलेल्या या सोहळ्यात बालगृहातील मुलांसोबत राखी बांधून आपुलकीचा स्नेहबंध अधिक दृढ करण्यात आला.
प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर स्वयंसेवकांनी मुलांच्या हातावर राख्या बांधून मिठाई वाटप केली. यानंतर अभंग, समूहगायन, नृत्य आणि पथनाट्य अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करून स्वयंसेवकांनी मुलांचे मनोरंजन केले. बालगृहातील लहानग्यांनीही या सांस्कृतिक सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेत आनंद लुटला.
हेही वाचा – बाप्पाच्या आगमनासाठी मुंबई सज्ज! चिंचपोकळी-लालबागमध्ये कडेकोट बंदोबस्त; हजारो पोलिसांचा पहारा
सामाजिक भान आणि शैक्षणिक मदतीचा हात
केवळ सण साजरा न करता मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी NSS च्या वतीने वह्या, पेन, रंग आणि डिजिटल स्लेट अशा शैक्षणिक साहित्याचे भेट म्हणून वाटप करण्यात आले. तसेच बालगृहाच्या गरजेचा विचार करून ५ ट्यूबलाईट्सचे योगदानही स्वयंसेवकांनी दिले.
हा उपक्रम कॅम्पस डायरेक्टर RAdm अमित विक्रम, प्राचार्या डॉ. पी. मालथी आणि NSS मेंटर डॉ. संदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमास डीन ऑफ स्टुडंट अफेयर्स डॉ. स्मिता पाटसकर, NSS प्रोग्राम ऑफिसर महेश ताटीकोंडा, को-प्रोग्राम ऑफिसर उत्कर्षा खराडे, IT विभाग समन्वयक मृणाली बोंग आणि सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.
निरागस मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि स्वयंसेवकांचा सेवाभाव यामुळे हा रक्षाबंधन सोहळा सर्वांच्याच स्मरणात राहणारा ठरला.





