नेपाळ जलप्रलयात अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी सरकार अलर्ट; बचावासाठी केंद्राशी समन्वय
मानसरोवर यात्रेकरूंना परत आणण्याचे नियोजन सुरू; MPSC पेपरप्रकरणात दोषींवर कारवाई, मराठा समाजासाठी आणखी निर्णय घेणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : नेपाळमध्ये आलेल्या भीषण जलप्रलयामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले असून, विविध देशांतील पर्यटकही अडकले आहेत. महाराष्ट्रातील काही पर्यटक नेपाळ आणि मानसरोवर यात्रेसाठी परिसरात असल्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्र सरकारच्या समन्वयाने अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित परत आणण्यासाठी नियोजन सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नेपाळमधील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले की, भारतीय आणि महाराष्ट्रातील नागरिक तेथे अडकले असण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून मंत्री गिरीश महाजन या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
मानसरोवर यात्रेकरूंच्या बचावासाठी प्रयत्न
काही पर्यटक तिबेटमध्येही गेल्याची माहिती असून, त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्र सरकार आणि दिल्लीतील संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्याचे नियोजन सुरू आहे.
“आम्ही सर्वजण अलर्ट मोडवर आहोत. ज्यांच्याशी संपर्क होईल, त्यांच्या बचावासाठी आवश्यक ती मदत केली जाईल. नागरिकांकडे त्यांच्या नातेवाईक किंवा परिचितांबाबत काही माहिती असल्यास ती सरकारला द्यावी,” असे आवाहन फडणवीस यांनी केले.
हेही वाचा – अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी वर्षभरात मराठी शिकावी; मुदतवाढीवर प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
भोरमधील हाय-व्होल्टेज प्रकल्पावर स्थानिकांशी चर्चा
भोर तालुक्यातील भोंगवली येथील हाय-व्होल्टेज सबस्टेशन आणि ट्रान्समिशन लाईनला स्थानिकांनी विरोध केल्याच्या मुद्द्यावरही मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली. केंद्र सरकारच्या मदतीने ट्रान्समिशन लाईनचे काम सुरू असून, त्यातील काही भाग भोरमधून जात आहे.
स्थानिकांच्या जमिनी यापूर्वी विविध प्रकल्पांसाठी संपादित झाल्याने नव्या प्रकल्पासाठी जमीन देण्यास विरोध होत असल्याचे त्यांनी नमूद केले. ट्रान्समिशन प्रकल्पाचे सुमारे ४० टक्के काम पूर्ण झाले असून, स्थानिकांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पुण्यात विजेची मागणी वाढत असून, आवश्यक सबस्टेशन उभारले नाहीत तर भविष्यात वीजपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भोरसह पुण्यातील इतर तालुक्यांमध्येही सबस्टेशन उभारण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
‘MPSC पेपरप्रकरणात कोणालाही सोडणार नाही’
एमपीएससीच्या पेपरप्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोषी कोणत्याही पक्षाचा असला तरी कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असावी, ही सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांच्या अहवालानुसार मोठ्या प्रमाणावर पेपर फुटल्याचे आढळले नसले, तरी एका व्यक्तीकडे पेपर गेल्याची बाब समोर आली आहे. पारदर्शकता कायम राखण्यासाठी एमपीएससीने संबंधित परीक्षा रद्द केल्याचे त्यांनी नमूद केले.
परीक्षा पद्धतीत आवश्यक बदल सुचवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती विद्यार्थी, शिक्षक आणि इतर संबंधित घटकांशी चर्चा करून अधिक प्रभावी आणि पारदर्शक परीक्षा पद्धती तयार करेल. या प्रक्रियेसाठी राज्य सरकार एमपीएससीला पूर्ण सहकार्य करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजासाठी आणखी निर्णय घेण्याची तयारी
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबतही मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या मागण्यांवर सरकारने आवश्यक कारवाई केली असून, पुढील मागण्यांबाबतही चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारचे प्रतिनिधी मराठा समाजासंदर्भातील निर्णय आणि कार्यवाहीची माहिती मनोज जरांगे यांच्यापर्यंत पोहोचवतील. “मराठा समाजासाठी आमच्या सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. भविष्यात आणखी निर्णय घेण्याची गरज भासल्यास तेही घेतले जातील,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.





