TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

सुप्रिया सुळेंच्या OBC प्रमाणपत्रावरून नवा वाद; लक्ष्मण हाकेंचा पवार कुटुंबीयांसह अनेक नेत्यांबाबत दावा

‘सुप्रिया सुळेंचा दाखला आहे की नाही माहीत नाही; मात्र अनेक बड्या नेत्यांकडे OBC प्रमाणपत्रे’ — हाकेंचा दावा, पुराव्यांबाबत प्रश्नचिन्ह

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याच्या विजय वडेट्टीवार यांच्या दाव्यावरून सुरू झालेला वाद अद्याप थांबलेला नाही. वडेट्टीवार यांनी या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबीयांसह राज्यातील अनेक राजकीय नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा केला आहे. मात्र, सुप्रिया सुळे यांच्याकडे प्रमाणपत्र आहे की नाही, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचेही हाके यांनी स्पष्ट केले आहे.

बारामतीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना लक्ष्मण हाके यांनी हा दावा केला. “सुप्रिया सुळे यांचे कुणबी प्रमाणपत्र आहे की नाही, हे मला माहीत नाही. मात्र, पवार कुटुंबीयांकडे ओबीसीची प्रमाणपत्रे आहेत,” असा दावा त्यांनी केला.

कुणबी दाखला घेऊन OBC प्रवर्गात येऊ शकतात

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांचा संदर्भ देत हाके म्हणाले की, संबंधित नियम आणि पुराव्यांच्या आधारे सुप्रिया सुळे भविष्यात कुणबी प्रमाणपत्र मिळवू शकतात. सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाष्य केले.

“सुप्रिया सुळेंचा दाखला आहे की नाही, हे मला माहीत नाही. मात्र, त्या कुणबी म्हणजेच ओबीसी प्रवर्गात येऊ शकतात, असा माझा दावा आहे,” असे हाके म्हणाले.

तसेच सदानंद सुळे ब्राह्मण असले तरी आवश्यक कागदपत्रे आणि मोडी लिपीतील नोंदींच्या भाषांतराच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळू शकते, असा दावाही त्यांनी केला. “मराठा समाजातील व्यक्ती ओबीसी प्रवर्गात येऊ शकत असेल, तर इतर समाजातील व्यक्तींनाही नियमांनुसार संबंधित प्रमाणपत्र मिळू शकते,” असे त्यांनी म्हटले.

हेही वाचा –  नेपाळ जलप्रलयात अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी सरकार अलर्ट; बचावासाठी केंद्राशी समन्वय

रोहित पवारांसह अनेक नेत्यांबाबत दावे

लक्ष्मण हाके यांनी रोहित पवार यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याची माहिती आपल्याला असल्याचा दावा केला. त्याचबरोबर सोलापूर, अहिल्यानगरसह राज्यातील अनेक राजकीय नेत्यांकडे मागासवर्गीय प्रमाणपत्र असल्याचेही त्यांनी म्हटले.

हाके यांनी आपल्या वक्तव्यात बबनराव शिंदे यांच्या कुटुंबातील विक्रम शिंदे आणि रणजित शिंदे, भालके, आवताडे, भाजपचे चेतनसिंह केदार, अहिल्यानगरमधील कर्डिले आणि गाडे तसेच अंबादास दानवे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि पृथ्वीराज सुतार यांच्यासह अनेक नेत्यांची नावे घेतली.

मात्र, या सर्व व्यक्तींकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचे दावे हाके यांनी केले असून, या दाव्यांबाबत संबंधितांकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

या स्पर्धेत OBC समाज टिकेल का?’

राज्यातील राजकीयदृष्ट्या प्रभावशाली कुटुंबांतील नेते जर मागासवर्गीय प्रमाणपत्रांच्या आधारे ओबीसी प्रवर्गातील संधींसाठी स्पर्धेत उतरले, तर सर्वसामान्य ओबीसी समाजातील व्यक्ती या स्पर्धेत टिकू शकेल का, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.

“फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सामाजिक न्यायाची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र, आमदार, खासदार आणि मंत्रीपदांवर प्रभाव असलेल्या व्यक्तींकडे मागासवर्गीय प्रमाणपत्रे असतील, तर सर्वसामान्य ओबीसी समाजाच्या संधींवर परिणाम होणार नाही का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या राजकीय वादात विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वी दिलगिरी व्यक्त केली असली, तरी लक्ष्मण हाके यांच्या नव्या वक्तव्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button