TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अन्नसुरक्षेसोबत व्यापाऱ्यांचे हितही जपणार; सुट्या खाद्यतेलासाठी लवकरच नवी SOP

मुख्यमंत्री फडणवीसांचा FDA ला मध्यम मार्ग काढण्याचा निर्देश; भेसळ रोखतानाच छोटे विक्रेते आणि पारंपरिक व्यवसाय सुरू ठेवण्यावर भर

मुंबई : राज्यात अन्नसुरक्षेच्या मुद्द्यावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सुरू केलेल्या कारवाईला आता अधिक संतुलित स्वरूप देण्यात येणार आहे. सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर कठोर निर्बंध लागू केल्यानंतर व्यापारी आणि छोट्या विक्रेत्यांकडून चिंता व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत ग्राहकांची सुरक्षितता आणि व्यापाऱ्यांचे हित यांचा समतोल साधण्यासाठी स्वतंत्र SOP (Standard Operating Procedure) तयार करण्याचे निर्देश FDA ला दिले आहेत.

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत तपासणी आणि कारवाईची मोहीम सुरू आहे. सुटे किंवा पॅकिंगशिवाय विकले जाणारे खाद्यतेल भेसळीच्या दृष्टीने अधिक जोखमीचे असल्याने त्यावर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा तेलाचा स्रोत, गुणवत्ता आणि भेसळ याबाबत ग्राहकांना खात्री करणे तुलनेने कठीण असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

तपासणीदरम्यान चुकीचे लेबलिंग, स्वस्त तेलांची भेसळ, आवश्यक परवान्याशिवाय व्यवसाय तसेच तेलाची अयोग्य पद्धतीने साठवणूक अशा बाबी आढळल्याचे FDA कडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे खाद्यतेलाची गुणवत्ता आणि ग्राहकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हा या कारवाईचा मुख्य उद्देश आहे.

हेही वाचा –  आयसीएमआर महाविद्यालयात डेलनेट डिजिटल ग्रंथालय प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न

छोट्या विक्रेत्यांवर अनावश्यक परिणाम नको

सुट्या तेलावरील कठोर निर्बंधांमुळे व्यापारी वर्गात निर्माण झालेल्या चिंतेची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. भेसळ रोखण्यासाठी आवश्यक नियम कायम ठेवतानाच पारंपरिक तेल व्यापार आणि छोट्या विक्रेत्यांवर अनावश्यक परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी FDA ला “मध्यम मार्ग” काढण्याचे निर्देश दिले आहेत. खाद्यतेलाची गुणवत्ता सुनिश्चित करणारी, भेसळ रोखणारी आणि कायदेशीर व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देणारी SOP तयार करण्यात यावी, अशी शासनाची भूमिका आहे.

FDA ची अन्नसुरक्षेवरील मोहीम सुरूच

दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली FDA ची अन्नसुरक्षेबाबतची तपासणी मोहीम सुरूच राहणार आहे. मुंबईसह राज्यातील विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्य व्यवसायांची तपासणी केली जात असून, अस्वच्छता, कालबाह्य खाद्यपदार्थ आणि इतर नियमांचे उल्लंघन आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जात आहे.

वारंवार गरम केलेल्या तेलाच्या वापराबाबतही FDA ने खाद्य व्यावसायिकांना सावध केले आहे. अशा तेलाच्या वापरामुळे आरोग्यासाठी हानिकारक घटक वाढण्याची शक्यता असल्याने खाद्य व्यवसायांनी अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करतानाच कायदेशीर व्यापाऱ्यांचे व्यवसायही सुरू राहावेत, या उद्देशाने सुट्या खाद्यतेलासाठी नव्या SOP कडे आता व्यापारी आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button