संकटाच्या क्षणी शिवराज मोरे मदतीला धावले; संबंधित तरुणीने व्यक्त केली कृतज्ञता
संबंधित तरुणीचा दावा- ‘तो मुलगा मला हॅरेस करत होता’; ‘राजकारण इतक्या खालच्या पातळीवर नेऊ नका’, युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज मोरेंची टीका

मुंबई : भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून केलेल्या आरोपांनंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. आंदोलनस्थळी घडलेल्या कथित प्रकारावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर मोरे यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित तरुणीनेही यावेळी आपली बाजू मांडत, एका तरुणाकडून आपल्याला त्रास दिला जात असल्याचा दावा केला.
संबंधित तरुणीने सांगितले की, “मला तो मुलगा खूप हॅरेस करत होता. मी अतिशय खडतर परिस्थितीतून जात होते. मी केबिनमध्ये गेले, तेव्हा तो मुलगा माझ्या मागे आला आणि माझ्यावर धावून आला. त्यावेळी मी प्रचंड घाबरले होते. त्यानंतर मी पोलिसांना कॉल केला.”
त्यानंतर आपण शिवराज मोरे यांना फोन केल्याचेही तिने सांगितले. “हे माझ्या भावासारखे आहेत. मला यांची मदत नक्की होईल, हे माहीत होते. म्हणून मी शिवराज मोरे यांना कॉल केला. ते मदतीला धावून आले. त्यांनी मला मदत केली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. मात्र, सध्या जे काही राजकारण सुरू आहे, त्याचे मला खूप वाईट वाटत आहे,” अशी प्रतिक्रिया तिने दिली.
‘दोघांची नार्कोटेस्ट करा’
भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी दाखवलेल्या व्हिडिओनंतर शिवराज मोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “मी आणि नवनाथ बन दोघांची नार्कोटेस्ट करा. कोण खोटं बोलतंय आणि कोण खरं बोलतंय, हे स्पष्ट होऊन जाईल,” अशी भूमिका मोरे यांनी मांडली.
नवनाथ बन यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मोरे म्हणाले की, “आम्ही गांधीवादी विचारांचे लोक आहोत. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन आरोप करणे अत्यंत चुकीचे आहे. राजकारण करताना सगळे चुकतात; मात्र अशा खालच्या पातळीवर जाऊन आरोप करणे मान्य नाही.”
‘राजकारण इतक्या खालच्या पातळीवर जाऊ नये’
या संपूर्ण प्रकरणात वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी वस्तुस्थिती समोर आणण्याची गरज असल्याचे मोरे यांनी सांगितले. आंदोलनस्थळी घडलेल्या कथित प्रकारावरून सध्या दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे केले जात आहेत.
दरम्यान, संबंधित तरुणीनेही नवनाथ बन यांना अनेक गोष्टींची माहिती नसल्याचे सांगत आपली बाजू मांडली आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकी वस्तुस्थिती काय आहे, याबाबत पुढील चौकशी आणि उपलब्ध पुराव्यांना महत्त्व राहणार आहे.




