पुण्यातील वाहतूक मार्गात बदल; उद्या ‘या’ मार्गांवर जाणे टाळा

पुणे | ईद सणानिमित्त बुधवार दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे शहरातील नानापेठ परिसरातून मिरवणूक काढण्यात येणार असल्याने मिरवणुकीच्या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
मिरवणुकीस सुरुवात मनुशाह मस्जिद, ४८२ नानापेठ येथून होऊन संत कबीर चौक, ए.डी. कॅम्प चौक, भारत सिनेमा, पद्मजी पोलीस चौकी चौक, निशांत सिनेमा, भगवानदास चाळ, चुडामन तालीम, मुफ्ती फौज चौक, सरदार पटेल रोड, कुरेशी मस्जिद, जान मोहम्मद स्ट्रीट, बाबाजान दर्गाह, चारबावडी चौकी, फुलवाला गल्ली, सेंटर स्ट्रीट रोड, भोपळे चौक, १५ ऑगस्ट चौक, एम.जी. रोड, महमद रफी चौक, कोहीनूर चौक, महावीर चौक, सेंटर स्ट्रीट पोलीस चौकी चौक, सरबतवाला चौक, क्वार्टर गेट, संत कबीर चौक, नाना चावडी चौक, अल्पना सिनेमा, हमजेखान चौक, गोविंद हलवाई चौक आणि सुभानशाह दर्गा चौक मार्गे सिटी जामा मस्जिद, शुक्रवार पेठ येथे मिरवणुकीची सांगता होणार आहे.
मिरवणुकीच्या मार्गावर तसेच या मार्गाला जोडणाऱ्या उपरस्ते व गल्लींच्या तोंडापासून आतील बाजूस १०० मीटर अंतरापर्यंत सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास बंदी राहणार आहे. तसेच मिरवणुकीच्या मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूस मिरवणूक सुरू असलेल्या कालावधीत वाहनतळास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांनी मिरवणुकीच्या मार्गाचा वापर टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मिरवणूक सुरू असताना रास्ता पेठ पॉवर हाऊस ते संत कबीर चौक या मार्गावरील वाहतूक समर्थ पोलीस स्टेशन, क्वार्टर गेट मार्गे वळविण्यात येईल. संत कबीर चौकात मिरवणूक आल्यानंतर क्वार्टर गेटकडून संत कबीर चौकाकडे येणारी वाहतूक सायकल कॉलनी, समर्थ पोलीस स्टेशन, रास्ता पेठ, पॉवर हाऊस, के.ई.एम. हॉस्पिटल व अपोलो सिनेमा मार्गे सोडण्यात येईल. नाना पेठेतून लक्ष्मी रोडने येणारी वाहने नाना चावडी चौकातून रास्ता पेठ-पॉवर हाऊस मार्गे वळविण्यात येतील.
हेही वाचा
पुणे इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन
मिरवणूक पद्मजी पोलीस चौकी चौकात आल्यानंतर क्वार्टर गेटकडून त्या दिशेने येणारी वाहने संतकबीर चौक मार्गे वळविण्यात येतील. ए.डी. कॅम्प चौकातून भारत सिनेमा गल्लीत मिरवणूक वळल्यानंतर पद्मजी पोलीस चौकी ते ए.डी. कॅम्प चौक या दिशेची वाहतूक क्वार्टर गेट, जुना मोटार स्टँडकडे वळविण्यात येईल. पद्मजी चौक ते निशांत सिनेमा दरम्यान मिरवणूक असताना समोरून येणारी वाहतूक कॅम्प हायस्कूलजवळून वळविण्यात येईल. चुडामन तालीम चौकाच्या दिशेने जाणारी वाहने पुलगेट किंवा जुना मोटार स्टँड मार्गे वळविण्यात येतील.
कॅम्प येथील वाय जंक्शनवरून एम.जी. रोडकडे येणारी वाहतूक बंद करून खाणे मारुती चौकाकडे वळविण्यात येईल. इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूकही परिस्थितीनुसार सकाळी ९ वाजल्यापासून बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल.
मुफ्ती फौज चौकातून कुरेशी मस्जिदकडे जाणारी वाहतूक बंद करून चुडामन तालीमकडे वळविण्यात येईल. व्होल्गा चौकाकडून महमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करून ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल. महावीर चौकातून सरबतवाला चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करून एम.जी. रोडने नाझ चौकाकडे वळविण्यात येईल.
मिरवणुकीच्या कालावधीत वाहतूक पोलिसांकडून परिस्थितीनुसार आवश्यकतेनुसार बदल करण्यात येऊ शकतात. नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस आयुक्त पी. आर. पाटील यांनी केले आहे.





