ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘दीक्षारंभ – स्वागत सोहळा 2026’ उत्साहात संपन्न

"सोशल मीडियाचा योग्य वापर करा व प्रवाहाबरोबर पुढे जाताना स्वतःचे मत जपा" - डॉ. ज्योती परिहार

चिंचवड | चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ‘दीक्षारंभ – स्वागत सोहळा 2026’ हा भव्य व प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारीच्या उपस्थितित उत्साहात संपन्न झाला.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची प्रेरणादायी सुरुवात व्हावी, महाविद्यालयाची संस्कृती, शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त, मूल्ये आणि भविष्यातील करिअरच्या संधी यांची विद्यार्थी व पालकांना ओळख व्हावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाली. त्यानंतर प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या यशाचा व कार्याचा संपूर्ण आढावा सांगून नवोदित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या पुणे विभागाच्या डेप्यूटी डायरेक्टर डॉ. ज्योती परिहार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “सोशल मीडियाचा योग्य वापर करा व प्रवाहाबरोबर पुढे जाताना स्वतःचे मत जपा,” असे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र बोर्डाचे डायरेक्टर डॉ. महेश पालकर यांनी “अभ्यासातील चिकाटी वाढवा आणि नोकरीसाठी स्वतः संधी तयार करा,” असे सांगत दशावताराचा खरा अर्थ स्पष्ट करून त्याप्रमाणे स्वतःच्या अंगी गुण बाळगण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले.

या कार्यक्रमानिमित्त वक्ते प्रा. विशाल शेवाळे, उद्योजक अभिमन्यू शांडिल्य, कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, संस्थेच्या खजिनदार डॉ. भूपाली शहा, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, एमबीएचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या डॉं. वनिता कुहाडे , प्रतिभा कॉलेजच्या प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, उपप्राचार्या डॉ . जयश्री मुळे, प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती ही कार्यक्रमाची विशेष शोभा ठरली.

हेही वाचा

पुण्यातील वाहतूक मार्गात बदल; उद्या ‘या’ मार्गांवर जाणे टाळा

कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते ‘दशावतार’ या संकल्पनेवर आधारित भव्य सांस्कृतिक सादरीकरण. भगवान विष्णूंच्या दहा अवतारांची कथा विद्यार्थ्यांनी नृत्य, अभिनय, संगीत, निवेदन आणि प्रभावी दृश्यरचनेच्या माध्यमातून अत्यंत कलात्मक पद्धतीने सादर केली. मत्स्य ते कल्की या प्रवासातील प्रत्येक अवताराचे सादरीकरण प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे ठरले.

सुंदर वेशभूषा, प्रभावी नृत्यदिग्दर्शन, आकर्षक रंगमंच, कलात्मक प्रॉप्स, पार्श्वसंगीत आणि प्रकाशयोजना यामुळे संपूर्ण सादरीकरणाला भव्य रूप प्राप्त झाले. सरस्वती वंदना तसेच आसावरीच्या सुरेल गायनाने कार्यक्रमात आध्यात्मिक रंग भरला.

या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत, आत्मविश्वास, शिस्त, समन्वय आणि उत्स्फूर्त सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. कोरिओग्राफर्स, सांस्कृतिक विभाग, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पडद्यामागे कार्यरत प्रत्येक सदस्याच्या अथक परिश्रमामुळे कार्यक्रमाला भव्य यश मिळाले.

कार्यक्रमानंतर पालकांनी “कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध, माहितीपूर्ण आणि प्रभावी होता. दशावताराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृती आणि मुळांशी जोडण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला,” अशा भावना व्यक्त करत कौतुक केले.

कार्यक्रमाच्या यशाबद्दल कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, सचिव डॉ. दीपक शहा यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “आजचा कार्यक्रम हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नव्हता, तर विद्यार्थ्यांच्या नव्या शैक्षणिक प्रवासाची एक प्रेरणादायी सुरुवात होती. संपूर्ण प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या टीमने आज एक नवा मापदंड निर्माण केला आहे.”

‘दीक्षारंभ – स्वागत सोहळा 2026’ हा कार्यक्रम नव्या विद्यार्थ्यांसाठी केवळ स्वागत समारंभ न ठरता ज्ञान, संस्कार, संस्कृती, आत्मविश्वास आणि नव्या स्वप्नांची भव्य सुरुवात ठरला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रवींद्र निरगुडे आणि प्रा. वर्षा निगुडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. स्नेहा भाटिया यांनी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button