गुरमीत राम रहीम पुन्हा तुरुंगाबाहेर; २१ दिवसांचा फर्लो मंजूर, दोन महिन्यांत दुसऱ्यांदा सुटका

Gurmeet Ram Rahim Singh Furlough | बलात्कार, हत्या आणि वेगवेगळ्या इतर प्रकरणांत शिक्षा भोगत असलेल्या गुरमीत राम रहीम सिंह याची २१ दिवसांच्या फर्लोवर सुटका करण्यात आली आहे. डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह याची २०१७ मध्ये दोषी ठरवल्यानंतर १७ व्यांदा तात्पुरती सुटका करण्यात आलीय. राम रहीम मंगळवारी पहाटे रोहतकच्या उच्च सुरक्षा असलेल्या सुनारिया तुरुंगातून २१ दिवसांच्या फर्लोवर बाहेर पडला.
गुरमीत राम रहीम सिंह कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मंगळवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तुरुगाबाहेर पडला. समोर आलेल्या माहितीनुसार, तो सिरसा येथील डेरा मुख्यालयाकडे रवाना झाला आहे. विशेष म्हणजे ३० दिवसांचा पॅरोल पूर्ण करून तुरुंगात परतल्यानंतर दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत त्याला नवीन फर्लो मिळाला आहे. ३० दिवसांचा पॅरोल पूर्ण करून २६ जून रोजी तो सुनारिया तुरुंगात परतला होता.
बलात्कार, हत्या प्रकरणात दोषी
राम रहीम दोन महिला अनुयायांच्या बलात्कार प्रकरणात दोषी सिद्ध झाल्यानंतर ऑगस्ट २०१७ मध्ये त्याची सुनारिया तुरुंगात रवानगी करण्यात आली. सिरसा येथील पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्या प्रकरणातही राम रहीम दोषी आढळला आहे. यासह इतर प्रकरणांमध्येही दोषी ठरवण्यात आल्यानंतर त्याची सुनारिया तुरुंगात रवानगी करण्यात आली.
हेही वाचा
पीएमपीएमएल संचालक मंडळाच्या बैठकीत प्रवासी सुरक्षितता व कार्यक्षमतेवर भर
#WATCH | Sirsa, Haryana: Rape convict Dera Sacha Sauda chief Gurmeet Ram Rahim Singh arrived at the Dera headquarters in Sirsa from Sunaria Jail after being granted 21-day parole pic.twitter.com/Q7WKr98dvG
— ANI (@ANI) August 25, 2026
आतापर्यंत १७ वेळा पॅरोल किंवा फर्लो
नव्या फर्लोसह राम रहिमला तुरुंगवासादरम्यान आतापर्यंत १७ वेळा पॅरोल किंवा फर्लो मिळाला आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला वारंवार मिळणारी सवलत आणि वारंवार होणाऱ्या तात्पुरत्या सुटकेबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात असून त्यावर टीकाही केली जात आहे.
या वर्षांत तिसऱ्यांदा बाहेर
या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये राम रहिमला ४० दिवसांचा पॅरोल मिळाला होता. त्यानंतर मे महिन्यात त्याला पुन्हा ३० दिवसांच्या पॅरोलवर सोडण्यात आले होते आणि तो कालावधी पूर्ण करून तो २६ जून रोजी रोहतक तुरुंगात परतला होता. त्यानंतर आता २१ दिवसांच्या फर्लोनंतर तो पुन्हा तुरुंगाबाहेर आला आहे. राम रहीमच्या सुटकेचा संबंध फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांशीही जोडला जात आहे.





