रुपाली चाकणकरांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल; सोशल मीडिया पोस्टवरून कारवाई
शिवाजीनगर पोलिसांत तक्रार; अश्लील, अपमानास्पद आणि धमकीवजा पोस्ट केल्याचा आरोप, पोलिसांकडून तपास सुरू

पुणे : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर बदनामीकारक, अश्लील आणि धमकीवजा पोस्ट केल्याचा आरोप चाकणकर यांनी तक्रारीत केला आहे.
रुपाली चाकणकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी आज गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणात रुपाली पाटील ठोंबरे, सुषमा अंधारे, दिपाली सय्यद, संगीता तिवारी, डॉ. आशा मिरगे, हनुमंत गलगटे, वर्षा कांबळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोशल मीडिया पदाधिकारी योगेश सावंत, मोहसीन शेख आणि महादेव बालगुडे यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.
चाकणकर यांच्या फिर्यादीनुसार, नाशिक येथील ईशान्येश्वर महादेव मंदिराचे अध्यक्ष अशोक एकनाथ खरात यांच्याशी त्यांची सुमारे नऊ वर्षांपूर्वी सामाजिक कार्यक्रमादरम्यान ओळख झाली होती. मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांनिमित्त त्यांची तेथे उपस्थिती होती.
हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत मोठी जबाबदारी मिळणार? भाजपच्या संसदीय समितीत एंट्रीची जोरदार चर्चा
18 मार्च 2026 रोजी खरात यांना एका बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्याचे माध्यमांमधून समजल्यानंतर, त्यांच्यासोबतच्या जुन्या सार्वजनिक कार्यक्रमांतील फोटो आणि व्हिडिओचा वापर करून आपल्यावर असंबंधित आरोप करण्यात आल्याचा दावा चाकणकर यांनी केला आहे.
20 मार्च रोजी सोशल मीडिया तपासताना सुमारे 19 फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अकाउंटवरून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या पोस्टचे स्क्रीनशॉट आणि इतर पुरावे त्यांनी पोलिसांकडे सादर केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
चाकणकर यांनी आपल्या तक्रारीत विविध व्यक्तींची नावे नमूद केली असून, त्यांच्या पोस्टवर इतर काही व्यक्तींनी लैंगिक, अश्लील आणि अपमानास्पद कमेंट केल्याचा आरोपही केला आहे. या प्रकारामुळे मानसिक त्रास आणि सामाजिक मानहानी झाल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, संबंधित सोशल मीडिया पोस्ट, अकाउंट्स आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.





