जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व – आमदार शंकर जगताप
१०० खाटांचा ''क्रिटिकल केअर ब्लॉक'' लवकरच कार्यान्वित होणार

जिल्ह्यातील नागरिकांना एकाच छताखाली मिळणार अत्याधुनिक उपचार सुविधा
पिंपरी चिंचवड : जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालय म्हणून लवकरच रुग्ण सेवेत रुजू होणार असल्याची ग्वाही आमदार शंकर जगताप यांनी दिली. रुग्णालयातील १०० खाटांचा ‘क्रिटिकल केअर ब्लॉक’ महिन्याभरात कार्यान्वित करण्याचे निर्देश आमदार शंकर जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या सुविधेमुळे पिंपरी चिंचवड सह जिल्ह्यातील नागरिकांना गंभीर आणि आपत्कालीन आजारांवरील अत्याधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
रुग्णालयातील एमआरआय, सीटी स्कॅन, एक्स-रे, बर्न वॉर्ड, एसएनसीयू आणि अतिरिक्त आंतररुग्ण सुविधांच्या माध्यमातून आरोग्यसेवेचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. सुपर स्पेशालिटी उपचार सुविधा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर नागरिकांना उपचारांसाठी खासगी अथवा दूरच्या रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागणार नाही. सर्वसामान्य रुग्णांना सुलभ, दर्जेदार आणि वेळेत उपचार उपलब्ध करून देणारे प्रमुख आरोग्य केंद्र म्हणून जिल्हा रुग्णालय विकसित केले जाणार आहे. असेही आमदार जगताप यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधा, अंतर्गत समस्या आणि प्रलंबित विकासकामांचा आमदार जगताप यांनी सोमवारी (ता. २४) संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेतला. या वेळी त्यांनी एमआरआय, सीटी स्कॅन आणि एक्स-रे युनिटची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले. यावेळी नगरसेविका तृप्ती कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उपायुक्त प्रदीप ठेंगल, सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भाग्यश्री थोपटे, उरो रुग्णालय अधीक्षक डॉ. अभिजीत होसमनी, अग्निशामक अधिकारी व्यंकटेश दुर्वास, उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, रुग्ण कल्याण समिती सदस्य डॉ. देविदास शेलार, राष्ट्रीय आरोग्य अभियान उपअभियंता मंदार कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभाग सहायक अभियंता प्रतीक्षा काळे (सिव्हील) , तानाजी थोपटे (इलेक्ट्रिक), अभियंता अनिल गाडे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा – रुपाली चाकणकरांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल; सोशल मीडिया पोस्टवरून कारवाई
यावेळी आमदार शंकर जगताप म्हणाले, पुणे जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्र भरातून येणाऱ्या रुग्णांना जिल्हा रुग्णालय आरोग्य सेवेसाठी मोठा दिलासा देणारे रुग्णालय ठरत आहे. याच रुग्णसेवेला नव्याने सुरू करण्यात येत असलेले १०० बेड अधिक चांगली आरोग्य सेवा देतील. या १०० बेडच्या माध्यमातून येथे येणाऱ्या रुग्णांना चांगली आरोग्य सेवा तात्काळ मिळेल अशा सूचना आमदार जगताप यांनी दिले आहेत. येथे दोन ऑपरेशन थिएटर, आय.सी .यु, अत्याधुनिक वॉर्ड आणि ओपीडीची सुविधा दिली जाणार आहे. दरम्यान आजच्या बैठकीत रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेऊन बाह्यरुग्ण विभागाची (ओपीडी) क्षमता वाढवावी. उपलब्ध मनुष्यबळ आणि वैद्यकीय यंत्रसामग्रीचे योग्य नियोजन करून रुग्णांना सर्व आरोग्य सुविधा वेळेत मिळतील, याची दक्षता घ्यावी, असे जगताप यांनी सांगितले. रुग्णालयातील स्वच्छता, ड्रेनेज, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, अग्निसुरक्षा, औषध भांडार, प्रशासकीय कार्यालय, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात आला. बर्न वॉर्ड, एसएनसीयू विभाग, अतिरिक्त आंतररुग्ण कक्ष, एसटीपी व ईटीपी प्रकल्प, पोलिस मदत केंद्र आणि रुग्णांच्या नातेवाइकांसाठी प्रतीक्षालयाची प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
लिफ्ट, ‘पिंक टॉयलेट’, पोलिसांची गस्त वाढविण्याची सूचना
रुग्णालयातील सर्व लिफ्ट नियमित व सुरक्षितपणे सुरू ठेवाव्यात. प्रतीक्षालयाचे अद्ययावतीकरण करून उद्यानातील सुविधा सुसज्ज व सुस्थितीत ठेवाव्यात. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या स्थापत्यविषयक कामांची दैनंदिन देखरेख करावी. रुग्णालय परिसरात आणि बाहेरील भागात महिलांसाठी ‘पिंक टॉयलेट’ची सुविधा उपलब्ध करून द्यावी. रुग्णालयाच्या बाहेरील अंडरपासमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था कार्यान्वित ठेवावी. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनांचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांना देण्यात आल्या. परिसरातील कचऱ्याची समस्या तातडीने दूर करणे, पोलिसांची गस्त वाढविणे तसेच भटकी कुत्री, मांजरे व इतर प्राण्यांमुळे रुग्णांना त्रास होणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही देण्यात आले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित कामांमध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. देशाचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदृष्टीतून आणि महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रामध्ये आरोग्य सेवा अधिक बळकट होत आहे. याच माध्यमातून हे जिल्हा रुग्णालय अधिक सक्षम, सुरक्षित, सुविधायुक्त आणि रुग्णाभिमुख करण्यासाठी सूचना केल्या आहे. जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या रूपात रुग्णसेवेत आणण्यासाठी आवश्यक कामांना गती देण्यात येत आहे. रुग्णालयातील १०० खाटांचा ‘क्रिटिकल केअर ब्लॉक’ लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा यासाठी प्रत्येक कामाचा नियमित पाठपुरावा केला जाईल.”
— शंकर जगताप
आमदार, चिंचवड विधानसभा मतदार संघ





