सुपा औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणावर तातडीने कारवाई करा; विखेंचे अधिकाऱ्यांना आदेश
स्थानिक तरुणांना रोजगार न देणाऱ्या कंपन्यांची माहिती मागवली; अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या प्रश्नांवरही निर्देश

अहिल्यानगर : नगर-पुणे रस्त्यावरील सुपा औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांकडून नैसर्गिक पाणीस्रोत प्रदूषित होत असल्याच्या तक्रारींची पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी गंभीर दखल घेतली आहे. संबंधित कंपन्यांची माहिती संकलित करून त्यांच्याविरोधात तातडीने कारवाईचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश त्यांनी औद्योगिक विकास महामंडळ आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले.
सुपा औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योग बाहेरून कामगार आणत असल्याने स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळत नसल्याची बाब बैठकीत समोर आली. स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य मिळणे आवश्यक असून, स्थानिक युवकांना नोकरी न देणाऱ्या उद्योजकांना पाठीशी घालू नका, असे निर्देश विखे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
याबाबत औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक माहिती सादर करावी. तसेच पुढील आठवड्यात कामगार आयुक्तांसोबत बैठक घेऊन याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे विखे यांनी सांगितले.
हेही वाचा – मुख्यमंत्री फडणवीस यांनी घडवले तीन पार्थिव शिवलिंग; नागपुरातील ९१ लाख शिवलिंग निर्मिती सोहळ्याला भेट
सुपा औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांकडून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे नैसर्गिक पाणीस्रोत प्रदूषित होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. अशा कंपन्यांची माहिती गोळा करून त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या कारवाईचा अहवाल सादर करण्याच्या सूचना विखे यांनी दिल्या.
औद्योगिक वसाहतीतील वाढत्या अतिक्रमणांवर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी निर्धारित वेळेत मोहीम राबवावी, असे निर्देश देण्यात आले. सुपा बसस्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अतिक्रमणे हटवून अतिरिक्त वाहतूक पोलीस नियुक्त करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
पावसाळ्यात गटारीचे पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना होणाऱ्या त्रासाचीही गंभीर दखल घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले.
नगर-पुणे रस्त्यावरील नारायणगव्हाण येथील रस्ता रुंदीकरणासाठी ग्रामस्थांशी चर्चा करून आवश्यक जमिनीचे अधिग्रहण करावे. संबंधितांना मोबदला देण्याबरोबरच उर्वरित जमिनीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश विखे यांनी दिले. गायरान जमीन आणि अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
सुपा येथील बैठकीला आमदार काशिनाथ दाते, अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी गणेश राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.





