रुग्णांच्या नातेवाईकांना मिळणार निवारा, भोजन आणि मार्गदर्शन; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामध्ये सामंजस्य करार; गरीब रुग्णांना उपचार मिळणे होणार अधिक सुलभ

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना अधिक चांगल्या सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करणाऱ्या विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मोठ्या रुग्णालयांमध्ये दररोज हजारो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपचारासाठी येतात. उपचाराचा खर्च, राहण्याची व्यवस्था, भोजन आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव यामुळे नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्या दूर करण्यासाठी विविध घटकांना एकत्र आणून सुलभ आणि पारदर्शक यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या सामंजस्य करारामुळे धर्मादाय रुग्णालये आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणारी मदत थेट आणि वेळेत रुग्णांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवता येणार आहे. धर्मादाय आयुक्तांच्या नियंत्रणाखालील रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांवर मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार केले जातात. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची यंत्रणा जोडली जाणार आहे.
हेही वाचा – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक; 29 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा
रुग्णालयांच्या परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा, मोफत किंवा अल्पदरात भोजन तसेच वैद्यकीय मार्गदर्शनाची सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून दिली जाणार आहे. आरोग्य सेवा घेताना सर्वसामान्यांना येणाऱ्या अडचणी दूर करणे आणि प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
धर्मादाय संस्था, शासकीय यंत्रणा आणि संबंधित रुग्णालये यांच्या सहकार्याने विविध ‘त्रिपक्षीय सामंजस्य करार’ करण्यात येणार आहेत. त्यामुळे धर्मादाय संस्थांचे योगदान आणि सरकारी यंत्रणेची कार्यक्षमता एकत्र आणून राज्यात प्रभावी आरोग्य सहाय्य मॉडेल उभारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
संस्थांना सहभागाचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
या उपक्रमासाठी आवश्यक सर्व माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिकाधिक धर्मादाय संस्था आणि संबंधित संस्थांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.





