सिंधुदुर्गात ऊस उत्पादकता वाढविण्यासाठी विशेष उपाययोजना; नितेश राणेंचे निर्देश
ऊसतोडणीतील अडचणी दूर करण्यासाठी साखर कारखान्यांच्या संचालकांसोबत स्वतंत्र बैठक; आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित वाणांचा वापर करण्याच्या सूचना

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ऊसाची उत्पादकता वाढविण्यासोबतच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाचे अधिकारी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि शेतकऱ्यांची बैठक झाली.
जिल्ह्यात सध्या सुमारे १ हजार ३५५ हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड करण्यात आली आहे. मात्र, ऊसतोडणी टोळ्या उशिरा उपलब्ध होणे, वेळेत ऊसतोडणी न होणे आणि अवेळी लागवड यामुळे ऊस उत्पादनात घट होत असल्याचे शेतकरी, शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले.
शेतकऱ्यांना वेळेत ऊसतोडणीची सुविधा मिळावी आणि ऊसतोडणीतील अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊसतोडणीसाठी आवश्यक सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा – तुकाराम मुंढेंचा स्पष्ट संदेश; व्यक्तीपेक्षा संस्था आणि संविधानाप्रती बांधिलकी महत्त्वाची
यावर साखर कारखान्यांच्या संचालकांसोबत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. ऊसतोडणीचा प्रश्न समन्वयातून सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र आणि उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित वाण आणि योग्य लागवड पद्धतींबाबत मार्गदर्शन करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
प्रायोगिक तत्त्वावर प्रगतिशील शेतकऱ्यांची निवड करून त्यांच्या माध्यमातून ऊस उत्पादकता वाढविण्यासाठी कार्यक्रम राबवावा, अशी सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केली.
नापणे येथील ऊस संशोधन केंद्राला आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासोबतच केंद्राचे बळकटीकरण करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
ऊस उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकरी, साखर कारखाने, कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग यांनी समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश सावंत, ऊस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार शेटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.





