SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! 1 ऑक्टोबरपासून कॅश काढण्याचे नियम बदलणार
महिन्यातील 4 व्यवहार मोफत; त्यानंतर प्रत्येक कॅश विड्रॉव्हलसाठी 15 रुपये + GST शुल्क

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 ऑक्टोबर 2026 पासून बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट (BSBD) खातेधारकांसाठी अतिरिक्त रोख पैसे काढण्याच्या व्यवहारांवरील शुल्कात बदल होणार आहे. महिन्यातील पहिल्या चार कॅश विड्रॉव्हल व्यवहारांनंतर प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी आता 15 रुपये अधिक GST शुल्क आकारले जाणार आहे.
SBIच्या BSBD खातेधारकांना महिन्यातून एकूण 4 रोख व्यवहार विनामूल्य करता येतात. यामध्ये बँकेच्या शाखेतून रोख रक्कम काढणे, SBIच्या ATMमधून पैसे काढणे तसेच इतर बँकांच्या ATMमधून पैसे काढणे यांचा समावेश आहे.
सध्या चार मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक अतिरिक्त कॅश विड्रॉव्हलसाठी 10 रुपये आणि GST शुल्क आकारले जाते. मात्र, 1 ऑक्टोबरपासून हे शुल्क 15 रुपये + GST होणार आहे.
हेही वाचा – श्रीलंकेच्या संघात मोठे बदल; भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी दोन खेळाडूंची निवड
महिन्यातील पहिल्या चार व्यवहारांच्या मर्यादेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, पाचवा किंवा त्यानंतरचा रोख पैसे काढण्याचा व्यवहार केल्यास वाढीव शुल्क लागू होईल. ATM व्यवहार अपयशी ठरल्यास किंवा केवळ बॅलन्स तपासणीसारख्या गैर-आर्थिक व्यवहारांवर हे शुल्क लागू होणार नाही.
BSBD खातेधारकांसाठी चेकबुकच्या शुल्कातही बदल करण्यात येणार आहे. एका आर्थिक वर्षात पहिल्या 10 चेक पानांचे चेकबुक मोफत मिळेल. त्यानंतर 10 पानांच्या चेकबुकसाठी 40 रुपये + GST, तर 25 पानांच्या चेकबुकसाठी 75 रुपये + GST शुल्क आकारले जाईल. ज्येष्ठ नागरिकांना या चेकबुक शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
रोख व्यवहारांवरील अतिरिक्त शुल्क टाळण्यासाठी ग्राहकांनी महिन्यातील कॅश विड्रॉव्हलचे नियोजन करणे फायदेशीर ठरणार आहे. शक्य असल्यास UPI, नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगसारख्या डिजिटल माध्यमांचा वापर केल्यास अतिरिक्त रोख व्यवहारांचे शुल्क टाळता येऊ शकते.





