Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मातंग समाजासाठीच्या योजनांची अंमलबजावणी गतीने करा; सचिन अहिर यांचे निर्देश

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या १९ शिफारशींचा आढावा; योजनांसाठी निधी, कर्ज सुविधा आणि प्रशिक्षणावर भर

मुंबई : क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने आणि जलदगतीने कार्यवाही करावी, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांनी दिले.

विधानभवन येथे सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभागाशी संबंधित आढावा बैठक झाली. या बैठकीत अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाशी संबंधित आयोगाच्या १९ शिफारशींसह सामाजिक न्याय विभागाशी संबंधित शिफारशींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. महामंडळाच्या विविध योजनांसाठी आवश्यक निधीची तरतूद, शासन मान्यता आणि विविध विभागांमधील समन्वय याबाबत अहिर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

२१ सप्टेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अण्णाभाऊ साठे विकास महामंडळासह संबंधित महामंडळांच्या योजनांबाबत विविध विभागांना निर्देश देण्यात आले होते. सामाजिक न्याय, कृषी, सार्वजनिक बांधकाम, महिला व बालविकास, नगरविकास, गृह आणि सामान्य प्रशासन विभागांशी संबंधित योजनांचा पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी झालेल्या कार्यवाहीचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला.

मातंग समाजातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तेलगिरणी, गहू, डाळी आणि पोहा प्रक्रिया उद्योगांशी संबंधित दोन योजनांचे प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहेत. या योजनांच्या माध्यमातून कृषी व कृषी-आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

हेही वाचा –  २० ऑगस्टपासून रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीचे ज्ञान अनिवार्य

महामंडळाच्या योजनांसाठी योग्य वित्तीय नियोजन करण्यावरही भर देण्यात आला. केंद्र शासनाच्या संबंधित संस्थांकडून कर्ज सुविधा उपलब्ध असतानाही योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या प्रशासकीय अडचणी दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. लाभार्थ्यांचा सहभाग, वित्तीय संस्थांकडून मिळणारे कर्ज, प्रकल्पासाठी आवश्यक लाभार्थी हिस्सा आणि महामंडळाकडून दिली जाणारी आर्थिक मदत याबाबतही चर्चा करण्यात आली.

विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण योजनेसाठी यंदा अर्थसंकल्पीय तरतूद वाढवून सुमारे १०० कोटी रुपये करण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना स्टायपेंड देण्याची तरतूदही करण्यात आली आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

प्रलंबित निर्णयांची कार्यवाही संबंधित विभागांनी गतीने पूर्ण करून आवश्यक धोरणात्मक निर्णय आणि आर्थिक तरतुदी निश्चित कराव्यात, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

बैठकीस इतर मागासवर्गीय संचालनालयाच्या संचालक सोनाली मुळे, आर्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष सांगळे, आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी तसेच संबंधित अधिकारी आणि मातंग समाजाचे प्रतिनिधी मारोती वाडेकर, नारायण गायकवाड, कैलास खंदारे, नामदेव साठे आदी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group