अशोक सराफ यांनी मराठी सिनेमाला लोकाभिमुख करून वेगळी उंची दिली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपुरात महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ यांचा नागरी सत्कार; ६ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह प्रदान

नागपूर : मराठी माणूस हा वास्तववादी आहे. त्याच्या जीवनातील संघर्ष, वास्तव, मर्यादा, दुःख आणि आनंद अशोक सराफ यांच्या कलाकृतींमधून प्रभावीपणे दिसून येतो. सर्वसामान्यांच्या जीवनातील भावभावनांना त्यांनी आपल्या अभिनयातून हास्याची आणि आनंदाची किनार दिली. मराठी सिनेमा खऱ्या अर्थाने लोकाभिमुख करून त्याला वेगळी उंची देण्याचे कार्य अभिनेते अशोक सराफ यांनी केले, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
नागपूर महानगरपालिका, विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि श्री सिद्धीविनायक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ अभिनेते, महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री अशोक सराफ यांचा नागरी सत्कार वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आला. या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, अशोक सराफ यांच्यासारखे कलाकार लाभणे ही मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि रसिकांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या कलेचे कौतुक आणि योगदानाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा नागरी सत्कार म्हणजे नागपूरकरांच्या वतीने व्यक्त करण्यात आलेली कृतज्ञता आहे.
अशोक सराफ यांच्या कलाकृतींनी अनेक पिढ्यांना आनंद दिला आहे. त्यांच्या अभिनयामुळे अनेकांना मराठी सिनेमाची गोडी लागली. रसिकांच्या मनात त्यांनी निर्माण केलेल्या आनंदाचा हा सत्कार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा – मातंग समाजासाठीच्या योजनांची अंमलबजावणी गतीने करा; सचिन अहिर यांचे निर्देश
सत्काराला उत्तर देताना अशोक सराफ यांनी प्रेक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आजवर झालेल्या सत्कारांपैकी इतका भव्य सत्कार झालेला नाही. मात्र, प्रेक्षक आहेत म्हणून आम्ही आहोत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अशोक सराफ यांना सन्मानचिन्ह आणि ५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करून गौरविण्यात आले. विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांनी सन्मानचिन्ह आणि ५१ हजार रुपयांचा धनादेश, तर श्री सिद्धीविनायक ट्रस्टतर्फे १ लाख रुपयांचा धनादेश देऊन त्यांचा सत्कार केला.
अशोक सराफ यांनी ऐंशीव्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल यावेळी ८० दिव्यांनी औक्षण करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमास महापौर नीता ठाकरे, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार संदीप जोशी, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी-वखरे, नागपूर मनपातील सत्तापक्षनेते नरेंद्र बोरकर आणि मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी अशोक सराफ यांची प्रकट मुलाखत घेतली.





