Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

लोहगाव उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू करा; सुनेत्रा पवार यांचे निर्देश

पुणे जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचा आढावा; चाकण, राजगड, खेडसह दुर्गम भागातील प्रलंबित प्रस्तावांना गती देण्याच्या सूचना

मुंबई : पुणे जिल्ह्यातील लोहगाव उपजिल्हा रुग्णालय नागरिकांच्या सेवेत तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या, मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांची पूर्तता करून उर्वरित कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांना त्यांच्या जवळच्या परिसरात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रलंबित प्रस्तावांवरील कार्यवाहीला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली लोहगाव उपजिल्हा रुग्णालयासह पुणे जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या विविध विषयांवर बैठक झाली. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार सुनील टिंगरे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती जितेंद्र बडेकर, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या मोनिका हरगुडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लोहगाव उपजिल्हा रुग्णालय परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने ते लवकरात लवकर कार्यान्वित करणे आवश्यक आहे. रुग्णालय सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व परवानग्या आणि बाबींची पूर्तता करावी. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करताना बांधकाम तसेच इतर पायाभूत सुविधा दर्जेदार असतील, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पवार यांनी दिले.

हेही वाचा –  अशोक सराफ यांनी मराठी सिनेमाला लोकाभिमुख करून वेगळी उंची दिली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे जिल्ह्यातील दुर्गम तसेच औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागांमध्ये आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. राजगड (वेल्हे) येथील नवीन ग्रामीण रुग्णालयासाठी इमारत आणि आवश्यक पदे मंजूर करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. चाकण उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण करून आवश्यक पदनिर्मिती करावी, तसेच महाळुंगे (ता. खेड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एमआयडीसीची जागा जिल्हा परिषदेकडे तातडीने वर्ग करावी, असे पवार यांनी सांगितले.

खेड तालुक्यातील आंबेठाण परिसरातील मोठे औद्योगिक क्षेत्र लक्षात घेता तेथे आरोग्य उपकेंद्राला तातडीने मंजुरी देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसेच खेड तालुक्यातील दुर्गम आणि आदिवासी भागात नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

खेड-राजगुरुनगर ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याच्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करावी. बांधकाम पूर्ण झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी पदनिर्मितीची प्रक्रिया पूर्ण करावी, असेही निर्देश पवार यांनी दिले.

महानगरपालिकेतील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्थलांतरासंदर्भातील प्रस्ताव, विशेष बाब म्हणून आवश्यक मंजुरी आणि एएनएम केंद्रांवरील भरतीस परवानगी देण्याबाबतही तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पुणे जिल्ह्यात आधार नोंदणी ‘सीआरएस’मध्ये जनरेट होत नसल्यामुळे अनेक बालकांच्या जन्मनोंदणीत अडथळे निर्माण होत आहेत. या समस्येवर तातडीने तोडगा काढून संबंधित बालकांची जन्मनोंदणी सुरळीत होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना आवश्यक जागा तातडीने उपलब्ध करून देऊन ती जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.

दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी खेड तालुक्यातील पाईट येथे २४ तास १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.

आरोग्य सुविधांशी संबंधित निर्णयांची अंमलबजावणी केवळ कागदोपत्री न राहता त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना मिळाला पाहिजे. प्रलंबित प्रस्तावांचा कालबद्ध पद्धतीने निपटारा करून नागरिकांना आवश्यक आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात. संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने आणि तत्परतेने काम करून प्रत्येक निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी, असे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button