ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रस्तावित गार्डन वाचविण्यासाठी Gen Alpha मैदानात; ‘We Want Garden’च्या घोषणांनी वाकड दणाणले!

EON IT Park शेजारील प्रस्तावित जागेवरच गार्डन उभारण्याची मागणी; मनपा प्रशासनाला मोठ्या आंदोलनाचा इशारा

पिंपरी-चिंचवड | भूमकर चौक परिसरातील वाकडकर कॉर्नर येथील EON IT Park शेजारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने प्रस्तावित केलेले गार्डन प्रत्यक्षात साकारण्याच्या मागणीसाठी आता चिमुकल्या ‘Gen Alpha’नेच आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. प्रस्तावित गार्डनच्या जागेवरच गार्डन झाले पाहिजे, या मागणीसाठी मुलांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले. “We Want Garden”, “Garden झालेच पाहिजे”, “आमच्या भविष्यासाठी गार्डन हवे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

या जागेवर गार्डन उभारण्याबाबत यापूर्वी हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यामुळे लवकरच या ठिकाणी उद्यान साकारले जाण्याची अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून प्रस्तावित गार्डनच्या भवितव्याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून या विषयावर स्पष्ट माहिती मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

विशेष म्हणजे, माहितीच्या अधिकारात माहिती मागूनही संबंधित माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे प्रस्तावित गार्डनच्या जागेबाबत पडद्यामागे काही वेगळे निर्णय घेतले जात आहेत का, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.

‘गार्डन रद्द करू नका; याच जागेवर उभारा’

या पार्श्वभूमीवर परिसरातील Gen Alpha मधील मुलांनी पुढाकार घेत प्रस्तावित गार्डनच्या जागेवर आंदोलन केले. गार्डनसाठी उपलब्ध असलेली जागा अन्य कोणत्याही कारणासाठी वापरण्याऐवजी EON IT Park शेजारी प्रस्तावित असलेल्या याच जागेवर गार्डन साकारण्यात यावे, अशी ठाम भूमिका मुलांनी मांडली.

हेही वाचा

ग्रामसभेतील गोंधळ! धक्काबुक्कीनंतर ग्रामसेवकाचा मृत्यू; ६ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

आजच्या पिढीला मोबाईल, इंटरनेट आणि तंत्रज्ञानाची ओढ असली, तरी त्याचबरोबर खेळण्यासाठी मैदान, मोकळी जागा, झाडे-हिरवाई आणि स्वच्छ पर्यावरणाचीही तितकीच गरज आहे. त्यामुळे भविष्यातील पिढीच्या आरोग्याचा आणि मानसिक विकासाचा विचार करून गार्डनची जागा जपली पाहिजे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

आंदोलनाचा इशारा…

प्रस्तावित गार्डनबाबत महानगरपालिका प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, गार्डनचा प्रस्ताव रद्द केला जाणार नाही याची हमी द्यावी आणि त्याच जागेवर गार्डनच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी करण्यात आली. या मागणीवर प्रशासनाने लवकरात लवकर ठोस निर्णय घेतला नाही, तर Gen Alpha च्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासनाने या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून मुलांच्या मागणीची दखल घ्यावी आणि भविष्यातील पिढीसाठी असलेली हिरवीगार जागा वाचवावी, अशी मागणी वाकड-ताथवडे हौसिंग फोरमच्या वतीने करण्यात आली.

“गार्डन हा केवळ आजच्या नागरिकांचा विषय नाही; तो उद्याच्या पिढीच्या हक्काचा प्रश्न आहे. त्यामुळे प्रस्तावित जागेवरच गार्डन झाले पाहिजे.”

— Gen Alpha, वाकड-ताथवडे हौसिंग फोरम

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button