ग्रामसभेतील गोंधळ, धक्काबुक्कीनंतर ग्रामसेवकाचा मृत्यू; ६ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

जळगाव | पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथे ग्रामसभेत झालेल्या तीव्र गोंधळ आणि धक्काबुक्कीनंतर ग्रामसेवक पी. एन. पाटील यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गावातील सहा जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
सुनील पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १७ ऑगस्ट रोजी सकाळी शिवरे दिगर येथे ग्रामपंचायत कार्यालयाची ग्रामसभा सुरू होती. सभेदरम्यान गावातील सार्वजनिक मुतारीच्या कामाच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला.
ग्रामसभेत श्याम प्रकाश पाटील, ज्ञानेश्वर अशोक पाटील, राहुल वाल्मीक पाटील, गोरख सयाजी पाटील, ज्ञानेश्वर बापू पाटील आणि भूषण सरदार यांनी मध्येच उभे राहून गोंधळ घातला. ग्रामसेवक पी. एन. पाटील यांनी प्रशासकीय बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असता, वरील सहा जणांनी त्यांना घेरून खुर्चीवर बसवले आणि त्यांच्या छातीवर बुक्क्यांनी मारहाण केली. ग्रामसेवकाच्या आजारपणाची कोणतीही तमा न बाळगता त्यांच्यावर दबाव आणल्याने त्यांना जागेवरच हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तक्रारीवरून पारोळा पोलिसांनी सहा संशयितांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा
पुणे जिल्ह्यात SIR प्रक्रिया अंतिम टप्प्यात; ९९.९९ टक्के एन्युमरेशन फॉर्मचे वितरण पूर्ण
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो कर
ग्राम महसूल अधिकारी संघटना आक्रमक
ग्रामसेवकाच्या मृत्यूनंतर ग्राम महसूल अधिकारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. घटनेनंतर संघटनेच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी पारोळा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले, ज्यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वर अशोक पाटील या संशयिताला अटक केली.
दरम्यान, पारोळा पंचायत समिती आवारात संघटनेचे राज्याध्यक्ष संजूजी निकम यांच्या उपस्थितीत उर्वरित सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी लावून धरण्यात आली. या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) करिष्मा नायर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांच्यासह महसूल व ग्रामविकास विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





