TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

नाशिक-रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; गिरीश महाजन, भरत गोगावले यांच्यावर जबाबदारी

दीड वर्षांपासून प्रलंबित नियुक्तीला अखेर मुहूर्त; नाशिकच्या विकासाला आणि रायगडच्या सर्वांगीण प्रगतीला मिळणार गती

मुंबई : महायुती सरकारमध्ये गेल्या दीड वर्षांपासून चर्चेत असलेल्या नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, तर रायगडच्या पालकमंत्रीपदी शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपालांच्या आदेशानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीने या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर नाशिकची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे, तर रायगडची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना शिंदे गटात नाराजी निर्माण झाली होती. मंत्री भरतशेठ गोगावले हे रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही होते. तसेच नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेनेचे दादा भुसे यांच्या नावाचीही चर्चा होती.

महायुतीतील घटक पक्षांमधील मतभेदांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. अखेर सरकारने दोन्ही जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची नियुक्ती करून या राजकीय चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी पुन्हा एकदा गिरीश महाजन यांच्याकडे आली आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे होणार आहेत. रस्ते, वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि प्रशासकीय यंत्रणा सक्षम करण्याचे मोठे आव्हान महाजन यांच्यासमोर आहे.

हेही वाचा –  पावसाळ्यात आरोग्याची काळजी घ्या; ‘या’ ५ भाज्या ठरतील फायदेशीर

पालकमंत्रीपदाची नियुक्ती जाहीर झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी पंढरपूर येथे प्रतिक्रिया देताना, “पंढरपुरात देवाचे दर्शन घेत असताना ही बातमी समजली. त्यामुळे मला पांडुरंग पावला आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो,” असे म्हटले.

नाशिकमधील रस्त्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी शहरातील रस्ते सिमेंटचे करण्याचा निर्धार व्यक्त केला. काही काळ नागरिकांना त्रास सहन करावा लागेल; मात्र त्यानंतर नाशिक स्वच्छ आणि सुंदर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यापूर्वी कुंभमेळा मंत्री म्हणून काम केले असून आता पालकमंत्री म्हणून जबाबदारी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी सुरुवातीपासूनच आग्रही असलेले भरतशेठ गोगावले यांची अखेर या पदावर नियुक्ती झाली आहे. रायगड ही आपली कर्मभूमी आणि मायभूमी असल्याचे सांगत त्यांनी या जबाबदारीबद्दल समाधान व्यक्त केले.

“रायगडच्या मातीत वाढलो. येथील जनतेने मला प्रेम आणि विश्वास दिला. आज संपूर्ण रायगड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून सेवा करण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची आणि तितकीच मोठी जबाबदारी आहे,” अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी दिली.

दीड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्न अखेर मार्गी लागल्याने दोन्ही जिल्ह्यांतील विकासकामांना आता अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button