भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करा : सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बिरादार
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे मागणी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : शहरातील वाढती भटक्या कुत्र्यांची संख्या आणि नागरिकांवरील हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तातडीने प्रभावी उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बिरादार यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे
शहरातील विविध भागांमध्ये लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकीस्वारांवर भटक्या कुत्र्यांकडून हल्ले होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. नुकतीच म्हेत्रे वस्ती परिसरात चार वर्षीय चिमुरडीवर सात भटक्या कुत्र्यांच्या टोळीने केलेल्या जीवघेण्या हल्ल्याची घटना समोर आली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा – पिंपळे सौदागरच्या कु.कियांश शर्माचे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’वर नाव; जागतिक पातळीवर चमकला!

या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या, आक्रमक कुत्र्यांचा वावर आणि नागरिकांवरील हल्ल्यांच्या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे बिरादार यांनी पत्रात नमूद केले आहे. आक्रमक व धोकादायक भटक्या कुत्र्यांचा नियमानुसार बंदोबस्त करावा, कुत्र्यांची नसबंदी व लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवावी, नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना त्वरित कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही, यासाठी महापालिका प्रशासनाने या विषयावर तातडीने निर्णय घेऊन प्रभावी कार्यवाही करावी. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करून नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षाही श्रीनिवास बिरादार यांनी व्यक्त केली आहे.





