TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेराजकारण

बारामतीत पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’; सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचे आव्हान

युगेंद्र पवारांकडून स्वतंत्र पॅनलची घोषणा; लवकरच उमेदवारांच्या मुलाखती सुरू होणार, ‘शेतकरी सभासदांसाठी सक्षम पर्याय उभा करायचा’

बारामती : बारामतीच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पॅनलसमोर युगेंद्र पवार स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून आव्हान उभे करणार असल्याची माहिती समोर आली आहे. युगेंद्र पवार यांनी स्वतंत्र पॅनल देण्याची घोषणा केली असून, लवकरच उमेदवारांच्या मुलाखती सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी भाऊकी-गावकीचे गट-तट बाजूला ठेवून एकजुटीने पुढे जाण्याचे आवाहन केले होते. मात्र, आता युगेंद्र पवार यांनी स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची भूमिका घेतल्याने सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीतील चुरस वाढण्याची चिन्हे आहेत.

‘शेतकरी सभासदांसाठी सक्षम पर्याय उभा करायचा’

युगेंद्र पवार यांनी शेतकरी सभासदांच्या प्रश्नांना प्राधान्य देत स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. शेतकरी सभासदांसाठी सक्षम पर्याय निर्माण करण्याच्या उद्देशाने आपण निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

युगेंद्र पवार म्हणाले, “आम्हाला पवार विरुद्ध पवार असे करण्यात रस नाही. कुणाच्या विरोधात लढण्यापेक्षा शेतकरी सभासदांसाठी सक्षम पर्याय उभा राहावा, म्हणून आम्ही लढत आहोत. सुनेत्रा काकींबद्दल आमचा आक्षेप नाही; परंतु सोमेश्वरच्या संचालकांबद्दल आमचा आक्षेप आहे. यंदा बदल गरजेचा आहे.”

युगेंद्र पवार यांच्या या भूमिकेमुळे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पवार कुटुंबाशी संबंधित दोन गट आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा –  वर्षे सरली, आठवणी कायम! हिंदुस्थान अँटिबायोटिक्स शाळा २००३ बॅचच्या रियुनियनमध्ये रंगला गुरु-शिष्य स्नेहसोहळा

बारामतीत यापूर्वीही रंगला ‘पवार विरुद्ध पवार’ सामना

बारामतीत पवार कुटुंबातील राजकीय संघर्ष यापूर्वीही पाहायला मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात थेट लढत झाली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवत बारामतीची जागा कायम राखली.

त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही बारामतीत ‘पवार विरुद्ध पवार’ सामना पाहायला मिळाला. अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र, या लढतीत अजित पवार यांनी दणदणीत विजय मिळवला होता.

आता सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पवार कुटुंबातील दोन गट आमनेसामने येण्याची शक्यता असल्याने बारामतीच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button