झारखंड पेपरफुटी प्रकरण: ‘विधानसभा घेराव’ मोर्चाला हिंसक वळण; पोलिसांचा लाठीचार्ज!

Jharkhand Paper Leak Protest | झारखंड लोकसेवा आयोग (JPSC) आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या (JSSC) परीक्षांमधील पेपरफुटी व घोटाळ्यांविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. विविध मागण्यांसाठी हजारो विद्यार्थ्यांनी गुरुवारी राजधानी रांची येथे काढलेल्या ‘विधानसभा घेराव’ मोर्चाला हिंसक वळण मिळाले. पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड्स तोडून पुढे जाणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला. तसेच गर्दी पांगवण्यासाठी वॉटर कॅनन (पाण्याचे फवारे) आणि अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला.
झारखंडच्या विविध जिल्ह्यांतून हजारो तरुण व विद्यार्थी बस, रेल्वे आणि खाजगी वाहनांनी रांचीमध्ये दाखल झाले आहेत. परीक्षा पद्धतीतील पारदर्शकता आणि आरोपींवर कडक कारवाई या मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी आंदोलनात उतरले आहेत. राज्य सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झालेली चर्चेची फेरी निष्फळ ठरल्यानंतर विद्यार्थ्यांनी आज थेट विधानसभेवर धडक मारण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात आणि महामार्गांवर कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
हेही वाचा
पिंपरीत सेल्समनचाच कारनामा; बनावट चावीने दुकान उघडून २८ हजारांचे शर्ट लंपास
#WATCH | JPSC-JSSC aspirants’ protest in Ranchi (Jharkhand) | Fresh clash between student protesters and Police during ‘Vidhan Sabha Gherao’ march. Police use tear gas shells for crowd control. pic.twitter.com/SCZDYjqszZ
— ANI (@ANI) August 10, 2026
भाजपचे ठिय्या आंदोलन; प्रमुख नेते अटकेत
विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबूलाल मरांडी आणि खासदार आदित्य साहू यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतले आहे.





