ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भारताचा स्वाभिमान तिरंग्याच्या सन्मानासाठी पुण्यात उद्या भव्य ‘तिरंगा यात्रा’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग

– पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

भारतीय तिरंगा आणि देशाच्या सीमेवर मातृभूमीच्या रक्षणासाठी अहोरात्र लढणाऱ्या शूर जवानांच्या सन्मानार्थ पुण्यात मंगळवारी (११ ऑगस्ट) भव्य ‘तिरंगा यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होणार आहेत. राष्ट्रभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन भारतीय जवानांप्रती एकजूट आणि कृतज्ञता व्यक्त करावी, असे आवाहन पिंपरी चिंचवडकर राष्ट्रभक्त नागरिक संघटनांनी केले आहे.

मंगळवारी दुपारी २.३० वाजता पुणे कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर, गणेशखिंड रोड येथे पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी एकत्र येण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येथून नागरिक तिरंगा यात्रेत सहभागी होणार आहेत. फर्ग्युसन कॉलेज रोड ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुतळा चौक, डेक्कन असा यात्रेचा मार्ग असणार आहे.

देशाच्या सीमेवर प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी तसेच देशाची एकता, अखंडता आणि सामर्थ्याचा संदेश देण्यासाठी ही तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्यास राष्ट्रभक्तीचा जागर आणि जवानांप्रती असलेला सन्मान अधिक प्रभावीपणे व्यक्त होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रभक्त नागरिकांनी कुटुंबीय, मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रभक्त नागरिकांकडून करण्यात येत आहे. तिरंगा यात्रेत सहभागी होण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधून जाणाऱ्या नागरिकांसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. पुणे कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर, गणेशखिंड रोड, पुणे येथे नागरिकांसाठी एकत्र येण्याची तसेच पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी २.३० वाजता नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवडमधील विविध भागांतून नागरिक, कार्यकर्ते आणि राष्ट्रभक्त पुण्याकडे रवाना होणार असून, कृषी महाविद्यालय परिसरातून यात्रेत सहभागी होण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळेत उपस्थित राहून नियोजनाला सहकार्य करावे, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा –  बिग बॉस फेम लोपामुद्रा राउतच्या घरात 76 लाखांची चोरी; फरार चोरट्याला बिहारमधून अटक

फर्ग्युसन कॉलेज रोड ते संभाजी महाराज चौक

भव्य तिरंगा यात्रेचा मार्ग फर्ग्युसन कॉलेज रोड ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुतळा चौक, डेक्कन असा असणार आहे. हातात तिरंगा घेऊन सहभागी होणारे नागरिक या मार्गावरून राष्ट्रभक्तीचा संदेश देणार आहेत. यात्रेदरम्यान भारतमातेचा जयघोष, तिरंग्याचा सन्मान आणि जवानांच्या शौर्याला सलाम या भावनेतून वातावरण भारावून जाण्याची शक्यता आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना एकत्र बांधणाऱ्या तिरंग्याच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम आणि सामाजिक एकजुटीचा संदेश देण्याचा उद्देश या यात्रेमागे आहे. त्यामुळे कोणताही राजकीय भेद न ठेवता राष्ट्रहिताच्या भावनेतून नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

तिरंगा हातात; राष्ट्रभक्ती मनात!

‘तिरंगा हातात घेऊया… राष्ट्रभक्तीची ताकद दाखवूया!’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन देशाच्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button