Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘ब्रिक्स फिल्म बाजारातून भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल’; मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई : भारताच्या २०२६ च्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आयोजित करण्यात आलेला पहिला ब्रिक्स फिल्म बाजार हा चित्रपट, तंत्रज्ञान आणि सर्जनशील उद्योगांसाठी जागतिक स्तरावरील महत्त्वाचा मंच ठरणार आहे, त्यातून भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

हॉटेल ट्रायडंट येथे आयोजित ‘ब्रिक्स सर्जनशील अर्थव्यवस्था (Creative Economy) – WAVES बाजार’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार, परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव (MER-III) राजीव बोडवडे, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव सेंथिल राजन, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (NFDC) व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (IFFI) संचालक आशुतोष गोवारीकर; तसेच विविध ब्रिक्स देशांतील चित्रपट निर्माते, स्टुडिओ प्रमुख, तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

मंत्री शेलार म्हणाले की, भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या काळात पहिल्या ब्रिक्स फिल्म बाजाराचे यजमानपद महाराष्ट्राला लाभणे ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. माहिती व प्रसारण मंत्रालय आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (NFDC) संयुक्तपणे साकारलेला हा दूरदर्शी उपक्रम जागतिक सर्जनशील अर्थव्यवस्थेचे भविष्य घडविणारा महत्त्वपूर्ण मंच ठरेल. मुंबई ही केवळ स्वप्नांची नगरी नसून जागतिक सर्जनशीलतेचे केंद्र बनत असल्याचे सांगून, ते म्हणाले की, सीमापार चित्रपट सह-निर्मिती, ओटीटी, डिजिटल माध्यमे, अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (AVGC) तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी निर्माण होत आहेत. या फिल्म बाजारामुळे सीमापार वितरण, सर्जनशील सहकार्य आणि दीर्घकालीन संस्थात्मक भागीदारीला चालना मिळेल.

हेही वाचा –  ‘पीएमआरडीए’चे ‘जीआयएस’ पोर्टल सज्ज; नियोजनविषयक सर्व माहिती आता एका ‘क्लिक’वर!

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत ‘विश्वगुरू’ होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ‘ऑरेंज इकॉनॉमी’ हा त्या दृष्टीकोनाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. सर्जनशील उद्योग हे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नसून आर्थिक विकास आणि भारताच्या ‘सॉफ्ट पॉवर’ला बळकटी देणारे प्रभावी माध्यम आहे. संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी संगम घडवून आणणे हे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. “संस्कृती आत्मा देते, तर तंत्रज्ञान अभिव्यक्तीला नवे सामर्थ्य देते, असे प्रतिपादनही मंत्री शेलार यांनी केले. महाराष्ट्रात जागतिक दर्जाची चित्रपट निर्मिती परिसंस्था विकसित करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. राज्यातील वैविध्यपूर्ण चित्रिकरण स्थळे, आधुनिक पायाभूत सुविधा आहेत. मुंबईत उभारण्यात येणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी ही संस्था एक्सआर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इमर्सिव्ह तंत्रज्ञान क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असेही मंत्री शेलार म्हणाले.

ब्रिक्स देशांकडे समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि विविध भाषा असल्या तरी प्रभावी कथाकथन, चित्रपट, संगीत आणि गेमिंग ही मानवी भावनांची सार्वत्रिक भाषा असल्याचे सांगून सर्जनशीलतेच्या माध्यमातून विविध देशांमधील सहकार्य, परस्पर विश्वास आणि दीर्घकालीन मैत्री अधिक दृढ होईल, असा विश्वास मंत्री शेलार यांनी व्यक्त केला. माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी ब्रिक्स देशांमधील सांस्कृतिक आणि आर्थिक भागीदारी अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. सह-निर्मिती, तंत्रज्ञान भागीदारी, बौद्धिक संपदा आणि वित्तपुरवठ्याच्या संधींवर या दोन दिवसीय कार्यक्रमात सविस्तर चर्चा होणार आहे. नवोदित सर्जकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्याचा मार्ग यामुळे खुला होईल, असे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (IFFI) संचालक आशुतोष गोवारीकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button