ताज्या घडामोडीपुणे

‘पीएमआरडीए’चे ‘जीआयएस’ पोर्टल सज्ज; नियोजनविषयक सर्व माहिती आता एका ‘क्लिक’वर!

रिंग रोड, मेट्रो मार्ग, पूररेषा ते गावहद्दीची माहिती घरबसल्या उपलब्ध; नागरिकांचे कार्यालयातील हेलपाटे थांबणार!

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) नागरिक, गुंतवणूकदार, विकासक, वास्तुविशारद, अभियंते आणि विविध शासकीय विभागांना नियोजनविषयक माहिती सुलभ, पारदर्शक व डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी ‘जीआयएस’ (जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टिम) आधारित सार्वजनिक पोर्टल विकसित केले आहे. या डिजिटल सुविधेमुळे नागरिकांना प्रादेशिक नियोजनाची सर्व प्राथमिक माहिती एकाच ठिकाणी आणि घरबसल्या उपलब्ध होणार आहे.

या सार्वजनिक ‘जीआयएस’ पोर्टलवर ‘पीएमआरडीए’ कार्यक्षेत्राची सीमा, मंजूर प्रादेशिक योजना (आरपी), प्रस्तावित नगररचना योजना (टीपी स्कीम), गावहद्द तसेच महानगरपालिका व नगरपरिषदांच्या सीमांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच एमएसआरडीसी व पीएमआरडीए रिंग रोड, पुणे मेट्रो मार्ग, रेल्वे मार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वर्गीकृत रस्ते आणि मेट्रो स्थानकांभोवतीचे टीओडी (ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट) झोन या पायाभूत सुविधांच्या लेअर्सचाही समावेश आहे. पर्यावरण व सुरक्षेच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाच्या पूर लाल व निळ्या रेषा, वन्यजीव अभयारण्य, हिल स्टेशन व टाउनशिपच्या सीमा तसेच एनडीए, एचईएमआरएल, एमएडीसी (पुरंदर विमानतळ) आणि इतर संरक्षण विभागांचे बफर झोन यांची माहितीही या पोर्टलवर टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येत आहे.

हेही वाचा –  ‘आधुनिक सुविधा व दर्जेदार शिक्षणातून महाराष्ट्राला आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात अग्रस्थानी नेण्याचा निर्धार’; मंत्री हसन मुश्रीफ

या पोर्टलमुळे भूखंड किंवा मालमत्तेच्या परिसरातील नियोजनाची माहिती मिळवण्यासाठी नागरिकांना ‘पीएमआरडीए’ कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची आवश्यकता उरणार नाही. त्यामुळे वेळ, पैसा आणि शासकीय पाठपुराव्याचा ताण कमी होणार आहे. तसेच, विकासक, वास्तुविशारद व अभियंत्यांना विकास प्रस्ताव तयार करताना आवश्यक असणारी अधिकृत प्राथमिक माहिती सहज उपलब्ध होणार आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे नियोजन प्रक्रियेतील पारदर्शकता वाढून विविध शासकीय विभागांमधील माहितीचा समन्वय सुधारण्यास मदत होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘डिजिटल गव्हर्नन्स’ला चालना देणे आणि शाश्वत विकासासाठी माहितीआधारित निर्णय घेणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“‘पीएमआरडीए’च्या कार्यक्षेत्रातील नियोजन आणि विकास प्रक्रिया अधिक पारदर्शक, गतिमान व नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने हे जीआयएस आधारित सार्वजनिक पोर्टल अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. नागरिकांना आता त्यांच्या भूखंडाच्या परिसरातील रस्ते, पूररेषा, मेट्रो मार्ग आणि प्रादेशिक नियोजनाची अधिकृत प्राथमिक माहिती घरबसल्या एका क्लिकवर मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल आणि ‘पीएमआरडीए’ कार्यालयाच्या फेऱ्याही कमी होतील. ‘डिजिटल गव्हर्नन्स’ला चालना देत पारदर्शक व सुलभ प्रशासन देण्यासाठी ‘पीएमआरडीए’ कटिबद्ध आहे.”

— डॉ. अभिजीत चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button