Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक वंचितांच्या संघर्षाचे प्रेरणास्थान ठरेल’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, विचार आणि सामाजिक कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे आहे. चिरागनगर या त्यांच्या कर्मभूमीत उभारण्यात येणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि  स्मारक हे केवळ एक वास्तू नसून वंचित, कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या संघर्षाचे, स्वाभिमानाचे; तसेच सामाजिक परिवर्तनाचे जिवंत प्रतीक ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. चिरागनगर (घाटकोपर) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए), बृहन्मुंबई यांच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ‘लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था’ आणि स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मुंबईच्या महापौर रितू तावडे, खासदार संजय दिना पाटील, आमदार सर्वश्री राम कदम, अमित गोरखे, प्रसाद लाड, अमित साटम, अण्णा भाऊ साठे यांच्या स्नुषा श्रीमती सावित्रीबाई साठे, नात ज्योती साठे, नातू सचिन साठे आदींसह विविध लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या या महत्त्वाकांक्षी स्मारकाचा निर्णय २०१६ मध्ये घेण्यात आला होता. शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन हा प्रकल्प खासगी विकासकांकडून उभारण्यापेक्षा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून उभारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे स्मारकाचे काम अधिक पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने पूर्ण होणार आहे. स्मारक उभारताना परिसरातील नागरिकांच्या पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी कोणालाही बेघर करून विकास करणे हा शासनाचा मार्ग नाही. पात्र असो किंवा अपात्र, प्रत्येक नागरिकाला योग्य घर देऊनच हे स्मारक उभारण्यात येत आहे. सामाजिक न्यायाची हीच खरी अंमलबजावणी आहे. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा गौरव करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्यांच्या साहित्याचा जगातील २७ हून अधिक भाषांमध्ये अनुवाद झाला असून रशियन, फ्रेंच, इटालियनसारख्या आंतरराष्ट्रीय भाषांमधून त्यांचे विचार जगभर पोहोचले आहेत.

२०२२ मध्ये रशियातील मॉस्को विद्यापीठात त्यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले आणि तेथील साहित्यिकांनी त्यांच्या साहित्यावर चर्चा केली, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. स्मारकाचे काम वेळेत पूर्ण करण्याबाबत एसआरए आणि संबंधित यंत्रणांना निर्देश देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पाला अनावश्यक विलंब होऊ देणार नाही. जुलै २०२९ पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. या भव्य स्मारकाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा मानस आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक हे सामाजिक समता, स्वाभिमान, संघर्ष आणि परिवर्तनाचा संदेश देणारे प्रेरणास्थान ठरेल. मातंग समाजासह सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा –  ‘विकासकामांसह नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे’; मंत्री गिरीश महाजन

पुण्यात उभारण्यात येणाऱ्या क्रांतिवर लहुजी साळवे यांच्या स्मारकाचे सुमारे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या स्मारकाचेही लवकरात लवकर लोकार्पण करण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी आपले संपूर्ण आयुष्य वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या न्याय, स्वाभिमान आणि हक्कांसाठी समर्पित केले. त्यांच्या विचारांचा आणि साहित्याचा जागतिक स्तरावर प्रसार व्हावा, आधुनिक पिढीला त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी आणि सामाजिक परिवर्तनाची नवी दिशा मिळावी, यासाठी चिरागनगर येथे उभारण्यात येणारे ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था’ आणि भव्य स्मारक हे महाराष्ट्राचे प्रेरणास्थान ठरेल. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शासनाने सुमारे ३०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आवश्यकतेनुसार निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाला साजेसे, जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्य शासन शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि समाजातील वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे.

सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावणे, हेच शासनाचे प्रमुख ध्येय आहे. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या पात्र कुटुंबांचे सन्मानपूर्वक पुनर्वसन करण्यात येत आहे.  याशिवाय, अण्णा भाऊ साठे यांच्या मूळ गावी वाटेगाव येथे ५० कोटी रुपयांच्या खर्चातून स्वतंत्र स्मारक उभारण्यात येत आहे. राज्य शासन अण्णा भाऊंच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध स्तरांवर काम करत आहे.

‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी)’ ही मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची संस्था ठरेल, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. श्री. आठवले म्हणाले की, ‘बार्टी’च्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेली ‘आर्टी’ संस्था शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कौशल्य विकास, उद्योजकता आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून तरुणांना सक्षम करेल; तसेच, ‘आर्टी’ची स्थापना करून मातंग समाजाची दीर्घकालीन मागणी पूर्ण केल्याबद्दल त्यांनी राज्य शासनाचे आभार मानले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस व इतर मान्यवरांच्या हस्ते झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या, पारदर्शकतेतून परिवर्तनांकडे, या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. त्याचबरोबर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश प्राप्त करणारी प्रेरणा कैलास खवले हीचा सत्कार करण्यात आला. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कुटुंबियांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सचिव दत्तात्रय नवले यांनी आभार मानले.

अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाची वैशिष्ट्ये

▪️ प्रकल्पामध्ये २० मीटर उंचीचा भव्य कांस्य पुतळा उभारला जाणार आहे. त्यासोबत प्रोजेक्शन मॅपिंग (लेझर शो) असणार आहे.

▪️ अण्णा भाऊंच्या चिरागनगरमधील मूळ घराचे वाटेगाव येथील घराच्या धर्तीवर जतन केले जाणार आहे. प्रकल्पात ६ मीटर उंच प्रेरणा भिंत उभारली जाणार आहे. या भिंतीवर अण्णा भाऊंचा जीवनपट, म्युरल्स आणि ध्वनि-प्रकाश शो असणार आहे.

▪️ प्रकल्पात अत्याधुनिक डिजिटल अनुभव दालन उभारले जाणार आहे. यात डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्हर्चुअल टूर, मेणाचा पुतळा, बहुभाषिक ऑडिओ आणि सेल्फी पॉइंट उभारला जाणार आहे.

▪️ प्रकल्पात वॉक विथ अण्णा भाऊ संकल्पना राबविण्यात आली आहे. यात वाटेगाव ते मुंबई असा त्यांनी केलेला २५५ कि.मी.चा पायी प्रवास दाखवणारे विशेष दालन उभारण्यात येणार आहे.

▪️प्रकल्पात अभ्यास आणि प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार असून ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कौशल्य विकास केंद्र आणि अभ्यासिका सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

▪️ यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ॲम्फिथिएटर, हरित छत आणि १५० गाड्यांसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button