भरधाव बसची स्कूटीला जोरदार धडक; दोघे जखमी, बस चालकाविरुद्ध गुन्हा

तळेगाव | मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे परिसरात भरधाव बसने स्कूटीला धडक दिल्याने दोन युवक जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित माणिकराव इटाळे व त्यांचा मित्र अनिकेत प्रमोद चंदने हे अॅक्टिव्हा (एमएच ४९ एक्यू ६८११) वरून एल अँड टी कंपनीकडे जात असताना नवलाख उंब्रे रोडवर रस्ता ओलांडत होते. त्यावेळी एमएच १२ आरएन ०५०३ क्रमांकाच्या बसच्या चालकाने भरधाव व निष्काळजीपणे बस चालवत स्कूटीला जोरदार धडक दिली.
हेही वाचा
भारतीय हॉकी संघ निळ्याऐवजी केशरी रंगाच्या जर्सीत खेळणार!
या अपघातात फिर्यादी अजित इटाळे यांना डोळा, गाल व हाताला दुखापत झाली, तर अनिकेत चंदने यांच्या डोक्याला, छातीला व बरगडीला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ व १३४/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस फौजदार चौधरी करीत आहेत.





