‘जेन झी’ने एकत्र येऊन भारताला बदनाम केलं; जंतर-मंतर आंदोलनावरून रामदेवबाबांचा घणाघात!
देश रस्त्यावर नाही, तर संसदेतच चालणार : रामदेवबाबाचं विधान

नवी दिल्ली | NEET पेपर लीक प्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतरवर तब्बल ३६ ते ३७ दिवस चाललेले आंदोलन २५ जुलै रोजी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर संपले असले, तरी या आंदोलनावरून आता नवे राजकारण तापू लागले आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) नेतृत्वात आणि विरोधी पक्षांच्या पाठिंब्याने पार पडलेल्या या आंदोलनादरम्यान वापरण्यात आलेल्या भाषेवर आणि घोषणांवर रामदेवबाबा यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. ‘जेन झी’ने एकत्र येऊन भारताची संस्कृती बदनाम केली, असा थेट आरोप त्यांनी केला आहे.
आंदोलनकर्त्यांवर निशाणा साधताना रामदेवबाबा म्हणाले, “देश रस्त्यावरून चालणार नाही, तो संसदेतूनच चालणार. देशाचा शिक्षण मंत्री कोण असावा आणि कोण नाही, हे रस्त्यावर ठरत नाही; ते देशाचे पंतप्रधान आणि संसद ठरवते. आंदोलनादरम्यान काही लोकांनी ‘ब्राह्मणवादापासून आझादी’ आणि ‘आरएसएसपासून आझादी’ अशा घोषणा दिल्या. जर एखाद्या व्यक्तीचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला असेल आणि त्याने संघाकडून राष्ट्रवाद शिकला असेल, तर इतरांच्या पोटात का दुखते?”
हेही वाचा
सामाजिक उद्रेक। ताथवडेतील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी सर्वधर्मीय निषेध रॅली!

गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात बोलताना रामदेवबाबा पुढे म्हणाले, “आपल्या सर्वांचे पूर्वज एक आहेत आणि सर्वांचा डीएनए एकच आहे. परंतु, गेल्या काही दिवसांत जंतर-मंतरवर ‘जेन झी’ने एकत्र येऊन भारताला बदनाम करण्याचे काम केले. शिवीगाळ करणे किंवा अर्वाच्य भाषा वापरणे ही आपली संस्कृती नाही. आपण कायम सर्वांना आदर देऊन पुढे गेलो आहोत. विरोध करायचा असेल, तर तो विवेकपूर्ण आणि संवैधानिक मार्गाने चर्चेच्या माध्यमातून झाला पाहिजे.”





