Breaking-newsक्रिडामहाराष्ट्र

गुलवीर सिंगचा ऐतिहासिक पराक्रम.!

१०,००० मीटर शर्यतीत रौप्यपदक, हरजिंदर कौरचीही वेटलिफ्टिंगमध्ये चमक

ग्लासगो : २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार घोडदौड सुरूच असून पदकांची संख्या सातत्याने वाढत आहे. भारताने आतापर्यंत १२ पदकांची कमाई केली असून त्यामध्ये २ सुवर्ण, ७ रौप्य आणि ३ कांस्यपदकांचा समावेश आहे.

हेही वाचा –  ‘कुपोषण निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजना राबवा’; मंत्री आदिती तटकरे

स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारताचा धावपटू गुलवीर सिंग याने १०,००० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकत इतिहास रचला. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय पुरुष धावपटू ठरला आहे. गुलवीरने २७ मिनिटे ४९.८० सेकंदांत शर्यत पूर्ण केली. ऑस्ट्रेलियाच्या काई रॉबिन्सनने २७ मिनिटे ४८.९३ सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. यापूर्वी २०१० च्या दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत कविता राऊत यांनी महिलांच्या १०,००० मीटरमध्ये कांस्यपदक जिंकले होते.

दरम्यान, महिलांच्या वेटलिफ्टिंगमध्येही भारताने आणखी एक रौप्यपदकाची कमाई केली. पंजाबच्या हरजिंदर कौर हिने ६९ किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. ‘स्नॅच’ प्रकारानंतर दुसऱ्या स्थानावर असलेल्या हरजिंदरने शेवटपर्यंत आपले स्थान कायम राखत भारताला महत्त्वाचे पदक मिळवून दिले. या कामगिरीमुळे वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या पदकांची संख्या सातवर पोहोचली आहे.

या गटात कॅनडाच्या शार्लोट सिमोनोने एकूण २४० किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले, तर ऑस्ट्रेलियाच्या फीबी हेमनने २१८ किलो वजन उचलत कांस्यपदकावर नाव कोरले.

याआधी महिलांच्या ५३ किलो वजनी गटात ज्ञानेश्वरी यादवने रौप्यपदकाची कमाई केली होती. तसेच नाशिकच्या सर्वेश कुशारेने उंच उडी स्पर्धेत रौप्यपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. भारतीय खेळाडूंच्या या सातत्यपूर्ण यशामुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची पदकांची घोडदौड कायम आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button