पिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

Inside Story : राष्ट्रवादीमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी ‘लॉबिंग’

माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांची 'एन्ट्री' होणार? भाजपाला आव्हान देण्यासाठी 'लिस्ट' बदलण्याची तयारी

पार्थ पवार काय निर्णय घेणार?; राजकीय वर्तुळाचे लक्ष

पिंपरी-चिंचवड | विशेष प्रतिनिधी

महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाला प्रभावी आव्हान देण्यासाठी स्वीकृत नगरसेवकांच्या प्रस्तावित यादीत मोठे बदल करण्याची तयारी पक्षात सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे, माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून, त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून ‘एन्ट्री’ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ऑक्टोबर २०२६ मध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. महापालिकेत सत्ताधारी भाजपला सात, तर राष्ट्रवादी काँग्रेसला तीन स्वीकृत नगरसेवक नियुक्त करण्याची संधी मिळणार आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने माजी नगरसेविका सीमा सावळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप आणि पक्षाचे प्रवक्ते फझल शेख यांची नावे निश्चित केली होती. मात्र, हा प्रस्ताव मंजूर न झाल्याने आता नव्याने स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार आहे.

त्यामुळे इच्छुकांकडून पक्षश्रेष्ठींकडे ‘लॉबिंग’ सुरू झाल्याचे बोलले जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत भाजपाला अधिक प्रभावीपणे आव्हान देऊ शकतील, असे आक्रमक, अभ्यासू आणि जनाधार असलेल्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत पक्षांतर्गत सकारात्मक चर्चा सुरू आहे.

हेही वाचा :

राज्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान विविध भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज

राजकीय वर्तुळात माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या नावाची जोरदार चर्चा होत असली, तरी त्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. स्वीकृत नगरसेवक पदासाठी ते इच्छुक आहेत की नाहीत, पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानंतरच ते भूमिका मांडणार आहेत, की त्यांच्यासाठी पक्षामध्ये अन्य कोणती राजकीय जबाबदारी निश्चित केली जात आहे, याबाबत अद्यापही साशंकता कायम आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

दोन मतप्रवाह; बदलाची मागणी

स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरून राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह असल्याचे समोर येत आहे. पूर्वी निश्चित करण्यात आलेल्या नावांनाच संधी द्यावी, अशी भूमिका एका गटाची आहे. तर बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार नव्या आणि प्रभावी चेहऱ्यांना संधी देऊन भाजपाविरोधातील लढाई अधिक मजबूत करावी, अशी भूमिका दुसऱ्या गटाकडून मांडली जात आहे.

‘महाईन्यूज’ची भूमिका

स्वीकृत नगरसेवक हे केवळ राजकीय पुनर्वसनाचे पद नाही. महापालिकेच्या सभागृहात जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणारे आणि शहराच्या विकासाबाबत अभ्यासपूर्ण भूमिका मांडणारे नेतृत्व या माध्यमातून सभागृहात पोहोचणे अपेक्षित असते. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीकडे केवळ पक्षांतर्गत समतोल किंवा राजकीय तडजोड म्हणून पाहता येणार नाही.

आज पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भाजपाचे वर्चस्व असताना सक्षम आणि आक्रमक विरोधी पक्षाची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोरही नवे नेतृत्व पुढे आणण्याचे मोठे आव्हान आहे. पक्षनिष्ठा, जनाधार, अभ्यास आणि सभागृहात प्रभावी भूमिका मांडण्याची क्षमता या निकषांवर निर्णय होणे अपेक्षित आहे.

माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या नावाची चर्चा होत असली, तरी त्यांची नेमकी भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या संभाव्य ‘एन्ट्री’बाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये तथ्य किती आणि राजकीय अंदाज किती, हे येणारा काळच स्पष्ट करेल. त्याचबरोबर पूर्वी निश्चित करण्यात आलेल्या नावांवर पक्ष ठाम राहणार की राजकीय समीकरणे लक्षात घेऊन नव्या चेहऱ्यांना संधी देणार, हेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार पार्थ पवार स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीबाबत नेमका कोणता निर्णय घेणार? पक्षातील जुन्या चेहऱ्यांवर विश्वास दाखविणार की भाजपाला प्रभावी आव्हान देण्यासाठी नव्या, आक्रमक आणि अभ्यासू नेतृत्वाला संधी देणार? याकडे आता पिंपरी-चिंचवडच्या संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button