खेळाडू घडवा..पट वाढवा..! महापालिका शाळांमध्ये आता क्रीडा प्रबोधिनी पॅटर्न!
भाजपाच्या नगरसेविका रिटा सानप यांची सभागृहात मागणी

क्रीडा धोरणात आवश्यक सुधारणा करण्याबाबत लक्ष वेधले
पिंपरी- चिंचवड । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या क्रीडा गुणांना योग्य दिशा मिळावी, त्यांना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर ‘क्रीडा प्रबोधिनी (स्पोर्ट्स अकॅडमी)’ उभारण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका रिटा सानप यांनी महापालिका सर्वसाधारण सभेत केली.
महानगरपालिका सर्वसाधारण सभेत क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या विषयावर बोलताना सानप यांनी ‘खेळाडू घडवा आणि पट वाढवा’ ही अभिनव संकल्पना महापालिका शाळांमध्ये राबविण्याची गरज व्यक्त केली. महापालिका आयुक्तांनी ‘गुटी वाढवा, पट वाढवा’ ही संकल्पना यशस्वीपणे राबविली असून, त्याच धर्तीवर विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासासाठी हा उपक्रम सुरू करावा, अशी त्यांनी मागणी केली.
महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट क्रीडा गुण असूनही, योग्य प्रशिक्षण आणि सुविधांच्या अभावामुळे त्यांना मोठ्या स्पर्धांपर्यंत पोहोचता येत नाही. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर ‘क्रीडा प्रबोधिनी’ उभारणे काळाची गरज असल्याचे सानप यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
हेही वाचा
माळशेजघाट मार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पुर्णपणे बंद; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
या क्रीडा प्रबोधिनीमध्ये विद्यार्थ्यांना तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मोफत प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच, खेळाडू विद्यार्थ्यांसाठी योग्य आहार, वैद्यकीय सुविधा आणि अत्याधुनिक क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे. धावणे, लाँग जंप, खो-खो, कबड्डी, कुस्ती, फुटबॉल, योगासने, मल्लखांब यांसारख्या मैदानी खेळांसह बुद्धिबळ, कॅरम आणि टेबल टेनिस यांसारख्या इनडोअर खेळांचाही समावेश करण्यात यावा, अशी त्यांनी सूचना केली.
याशिवाय, पोलीस भरतीसह विविध शासकीय सेवांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी धावपट्टी, गोळाफेक आणि इतर क्रीडा प्रकारांसाठी स्वतंत्र सुविधा निर्माण करून आवश्यक साहित्य मोफत उपलब्ध करून देण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी केली.
या उपक्रमामुळे महापालिका शाळांमधील गुणवंत खेळाडू विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी तयार करता येईल. क्रीडा कोट्यातून विद्यार्थ्यांना भविष्यात शैक्षणिक व नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. तसेच, विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, शिस्त, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास निर्माण होण्यासही मोठी मदत होणार असल्याचे सानप यांनी सांगितले.
महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा धोरणात आवश्यक सुधारणा करून ‘क्रीडा प्रबोधिनी’ची संकल्पना प्रत्यक्षात आणावी. पिंपरी-चिंचवड शहरातून भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावणारे खेळाडू घडावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्रीडा क्षमता आहे. योग्य प्रशिक्षण, सुविधा आणि संधी मिळाल्यास हे विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शहराचे नाव उज्ज्वल करू शकतात. ‘क्रीडा प्रबोधिनी’च्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गुणवत्तेनुसार संधी मिळावी, हीच आमची भूमिका आहे.”
— रिटा सानप, नगरसेविका, भाजपा.





