कॉमेडी, अॅक्शन आणि सस्पेन्सचा फुल ऑन डोस! ‘मामाच्या गोव्याला जाऊया’च्या ट्रेलर प्रदर्शित

Mamachya Govyala Jauya Trailer: मराठी सिनेसृष्टीतील बहुप्रतीक्षित ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या टीझरमधून संत्या, बाबा, कुश्या आणि त्यांच्या लाडक्या मामाची गोवा ट्रिप पाहायला मिळाली होती. मात्र, आता ट्रेलरमध्ये कॉमेडीसोबतच अॅक्शन, सस्पेन्स आणि थराराचीही जबरदस्त मेजवानी पाहायला मिळत आहे.
ट्रेलरची सुरुवात गोव्याच्या मजेशीर सहलीने होते. संत्या, बाबा, कुश्या आणि मामा यांच्यातील धमाल केमिस्ट्री, विनोदी प्रसंग आणि सतत निर्माण होणारे गोंधळ प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करतात. मात्र, कथेला अचानक अनपेक्षित वळण मिळते आणि अंकुश चौधरी यांनी साकारलेला साधा, भोळाभाबडा मामा एका क्षणात डॉनच्या अवतारात समोर येतो. ट्रेलरच्या शेवटी दिसणारा हा अवतार प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतो. मामा खरोखरच डॉन आहे की त्यामागे आणखी काही रहस्य दडले आहे, याची उत्सुकता आता वाढली आहे.
हेही वाचा – राज्यपालांच्या उपस्थितीत १६७ वा आयकर दिन साजरा
ट्रेलरमध्ये गोव्याच्या सुंदर पार्श्वभूमीवर पाठलाग, अॅक्शन, सस्पेन्स आणि कॉमेडीचा सुरेख संगम पाहायला मिळतो. प्रत्येक प्रसंगानंतर कथा नवे वळण घेते, त्यामुळे पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम राहते. मैत्री, विनोद आणि रहस्य यांचा उत्तम मिलाफ या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचे ट्रेलरवरून स्पष्ट होते.
चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण यांची भन्नाट केमिस्ट्री विशेष लक्ष वेधून घेते. त्यांच्या संवादफेकीपासून ते कॉमिक टायमिंगपर्यंत प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांना खळखळून हसवणारी आहे. याशिवाय महेश मांजरेकर, संजय जाधव, सचिन गोस्वामी, मकरंद अनासपुरे, मकरंद देशपांडे, अवधूत गुप्ते आणि प्रवीण तरडे यांच्या दमदार भूमिका चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवतात. तसेच नेहा खान, रुचिरा जाधव आणि विदुला चौगुले यांचाही आकर्षक अंदाज ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो.





