Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘राज्यातील प्रत्येक घटकाला आदर्श प्रशासनाचा प्रत्यय देऊ’; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : राज्यातील सर्व समाज घटकातील व्यक्तींना सोबत घेऊन प्रत्येकाला विकासाची संधी भेटली पाहिजे याचे उत्तरदायित्व स्विकारुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यशैलीतून अपूर्व ठसा निर्माण केला आहे. लोकनेतृत्वाचे हे आदर्श मापदंड आहे. याचबरोबर सेवा हेच समर्पण या भूमिकेतून ज्यांनी आयुष्य वेचले असे लोकनेते स्व. अजितदादा पवार यांचा आज स्मृतीदिन आहे. या दिनविशेषाला अधोरेखित करतांना आपण अनेक लोकोपयोगी उपक्रम आज राबवित आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त या उपक्रमांच्या माध्यमातून सदिच्छा देण्यासह स्व. अजितदादा पवार यांच्या समर्पणाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण आपण करीत असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने बेलतरोडी येथील पाचमंदिर मैदान येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान व महाआरोग्य शिबीर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बेसा-पिपळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष कीर्तीताई बडोले, बहादुरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्रतिक्षाताई खंदाडे, उपमहापौर लिलाताई  हाथीबेड, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते व अधिकारी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकाभिमुख, पारदर्शी व गतिमान राज्याचा प्रत्यय देऊन आपल्यापुढे एक आदर्श मापदंड निर्माण केला आहे. याचबरोबर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला मौलिक अधिकार दिला. महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक व सामाजिक उत्तरदायित्वाच्या आदर्शांना डोळ्यापुढे ठेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांना आदर्श प्रशासनाचा प्रत्यय यावा यादृष्टीने आपण महाराजस्व अभियान हाती घेतले, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. राज्यातील 14 कोटी जनतेला त्यांच्या हक्कांना न्याय देण्यासह आपण दिलेल्या आश्वासनांची पूर्तता विविध निर्णयांच्या माध्यमातून आपण करीत आहोत. आज याठिकाणी सुमारे अडीच हजार लाभार्थ्यांना लाभ देत असून सर्व शिबिरांच्या माध्यमातून लाखो बांधवांपर्यंत पोहचत असल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाचे विश्वस्त म्हणून निष्पक्ष काम करण्याची भूमिका आम्ही स्विकारली आहे. राज्यातील प्रत्येकाच्या मालमत्तेचे रक्षण ही शासनाची जबाबदारी आहे. याच भूमिकेतून आम्ही प्रत्येकाची जागा कायदेशीर करुन देत आहोत. सोलापूर मधील 9 हजार घरांना मुख्यमंत्र्यांनी कायदेशीर करुन दिले. कोल्हापूरमधील सुमारे 55 गावे ब्रिटीशकालीन निगडीत होते. येथील 55 गावांना कायदेशीर करुन देण्यात आले आहे. गडचिरोली येथे फाळणीपासून बांग्लादेशी नागरिकांनी तेथे बांधलेल्या घरांचा प्रश्न प्रलंबित होता. मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीखाली आपण तो मार्गी लावला. सुमारे 12 हजार परिवारांना ते राहत असलेल्या जागेचे कायदेशीर मालकत्त्व देण्यात आले. याचबरोबर फाळणीमध्येच जे सिंधी बांधव अनेक महानगरात विखुरले गेले त्यांचा आजवर स्वमालकीच्या न सुटलेल्या प्रश्नाही आपण अधिकृत करुन दिले असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

हेही वाचा –  ‘राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी रोजगारनिर्मिती आणि कौशल्य विकासाचा संकल्प अधिक दृढ’; मंत्री मंगलप्रभात लोढा

जे वचन आम्ही जनतेला दिले होते ते मनस्वी पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. शेतकऱ्यांचे सुमारे 46 हजार कोटी रुपये एवढे वीजबिल व इतर देयके शासनाने माफ केले. बहिणींसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा दिला. त्यांना शेतकरी म्हणून आता आहे त्या सर्व योजना देण्याचा आपण प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. 1 जानेवारी 2011 पूर्वी ज्या गरीब व्यक्तींनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले अशा लोकांना जागेचा पट्टा आपण दिला. झुडपी जंगलांचे प्रश्न आपण मार्गी लावले आहे. 15 ऑक्टोबर 2024 पूर्वी ज्यांनी घर/प्लाट घेतला आहे, अशा प्लॉटधारकांना आता कायदेशीर दर्जा देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगून सुमारे 55 सेवा आपण राजस्व अभियानात समाविष्ट केल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील सर्व शिबीरांच्या माध्यमातून सुमारे 90 लक्ष परिवारांना आम्ही आदर्श सेवेचा प्रत्यय दिला आहे.

या शिबिरात 220 लोकांना मालकी हक्काचे पट्टे, 400 लोकांना स्वामित्व हक्क प्रमाणपत्र, आरोग्य शिबीर, कृषी विभाग, पंचायत समिती, एकात्मिक आदिवासी विभाग व नगरपरिषद, नगरपंचायत अंतर्गत विविध सेवांचे प्रमाणपत्र यावेळी शिबिरात वाटप करण्यात आले. 98 शेतमजूर महिलांना शासनाच्या नवीन धोरणानुसार शेतकरी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. उमरेड येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज 101 लाभार्थ्यांना पट्टे वितरण व इतर विविध लाभांचे वाटप महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले.

सफाई कामगारांच्या कार्याच्या गौरवातून आपण खऱ्या अर्थाने आजचा हा अनोखा दिवस सेवा समर्पण दिवस म्हणून साजरा करीत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सफाई कामगारांसाठी व्यापक परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली. लाडपागे समिती अंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासह त्यांच्या परिवारातील लोकांनाही स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी ही शासनाची भूमिका आहे. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या माध्यमातून अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी अनेक चांगले उपक्रम आयोजित करुन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला जपत समाजाला दिशा दिल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री बावनकुळे यांनी काढले.

सफाई कामगारांच्या कष्टाचा गौरव व्हावा याउद्देशाने इमामवाडा आयसोलेशन हॉस्पिटलच्या परिसरात आयोजित भव्य सेवा गौरव दिन समारंभात ते बोलत होते. यावेळी महापौर निताताई ठाकरे, आमदार मोहन मते, आमदार डॉ. परिणय फुके, उपमहापौर लिलाताई हाथीबेड, माजी महापौर दयाशंकर तिवारी, स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवाणी दाणी, मनपा आयुक्त डॉ. विपीन  इटनकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात सफाई कामगारांच्या योगदानाचा गौरव होत असल्याचे शेरसिंग डागोर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडपागे समितीची प्रभावी अंमलबजावणी करुन यात असलेल्या यात असलेल्या त्रुटींना दूर करीत अधिकाधिक लोकांना न्याय दिला आहे. त्यांच्या दूरदृष्टीतूनच सफाई कामगारांच्या मुलांनाही आता किराण दुकान, शिलाई मशीन, सायकल, ई-रिक्षा यांच्या माध्यमातून स्वयंरोजगाराला चालना देत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महापौर निता ठाकरे, माजी महापौर दयाशंकर तिवारी व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सुमारे 1 हजार 200 लाभधारकांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. यात सुमारे पाचशे महिलांना शिलाई मशिन वाटप, ई-रिक्षा, सायकल आदींचा समावेश होता.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button