‘स्थायी’चा प्रभारी पदभार स्वीकारताच मोशी दुर्घटनेतील कामगारांना श्रद्धांजली, सभा तहकूब
पिंपरी-चिंचवडच्या एक दिवसांच्या स्थायी समिती सभापती सारिका गायकवाड यांची सामाजिक संवेदना

पिंपरी- चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्या सौ. सारिका रवींद्र गायकवाड यांची गुरुवारी एक दिवसासाठी निवड करण्यात आली. स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी त्यांच्याकडे एक दिवसासाठी सभापतीपदाचा पदभार सोपविला.
सभापतीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सारिका गायकवाड यांनी संवेदनशीलतेचे दर्शन घडवत, मोशी येथील कचरा डेपो परिसरात झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कामगार बंधूंच्या स्मरणार्थ श्रद्धांजली अर्पण केली. तसेच, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत स्थायी समितीची सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला.
या प्रसंगी उपस्थित सदस्यांनीही दिवंगत कामगारांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. मोशी दुर्घटनेमुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर हळहळ व्यक्त करत असताना, स्थायी समितीच्या सभागृहातून मृत कामगारांप्रती व्यक्त करण्यात आलेली ही संवेदना महत्त्वाची मानली जात आहे.
हेही वाचा
पुणे विभागात भेसळयुक्त व प्रतिबंधित अन्नसाठ्यावर कारवाई; ८.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त
सारिका गायकवाड यांनी यावेळी, “मोशी दुर्घटनेत आपण शहरातील कष्टकरी कामगार बांधवांना गमावले आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आजची सभा तहकूब करून आपण त्यांना आदरांजली अर्पण करीत आहोत,” अशा भावना व्यक्त केल्या. तसेच, आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पीडित कुटुंबियांना सर्वोतोपरी आधार देणार आहोत, अशी ग्वाही दिली.
दरम्यान, एक दिवसासाठी स्थायी समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी स्वीकारण्याचा मान मिळाल्याबद्दल सारिका गायकवाड यांनी सभापती अभिषेक बारणे तसेच महापालिका प्रशासनाचे आभार मानले.
“मोशी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कष्टकरी कामगार बांधवांना श्रद्धांजली अर्पण करणे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर सहभागी आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आजची स्थायी समिती सभा तहकूब करून आपण त्यांना विनम्र अभिवादन करत आहोत. ईश्वर दिवंगत आत्म्यांना चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.”
– सारिका रवींद्र गायकवाड, नगरसेविका तथा एक दिवसीय स्थायी समिती सभापती.





