“तुतारीचे ५ खासदार आमच्या राष्ट्रवादीत येऊ शकतात”; धर्मराव बाबा आत्राम यांच्या दाव्याने खळबळ

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे ६ खासदार ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत फुटल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापलेले असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी एक मोठा बॉम्ब टाकला आहे. ‘तुतारीचे ५ खासदार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात येऊ शकतात’, असा खळबळजनक दावा धर्मराव बाबा आत्राम यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात, विशेषतः शरद पवारांच्या पक्षात मोठी खळबळ उडाली आहे.
आम्ही अशा प्रकारचं ऑपरेशन घड्याळ वैगेरे करणार नाही. पण खासदारांच्या मतदारसंघातील विकासकामे झाली पाहिजेत. आम्ही अशा प्रकारचं कोणतं ऑपरेशन राबवणार नाहीत. त्यांचं ऑपरेशन ते तुतारीवाले स्वत:च करतील. माझा असा अंदाज आहे की, तुतारीचे कमीत कमी ५ खासदार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात येऊ शकतात, असा दावा धर्मराव बाबा आत्राम यांनी केला आहे.
हेही वाचा
उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देश
जर पुन्हा निवडून यायचं असेल तर सर्वांनाच मतदारसंघात विकासकामे करण्याची आणि विकासाबरोबर राहण्याची गरज आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर आता लोकांचा विश्वास आणखी वाढला आहे. पक्ष देखील आणखी मजबूत होत आहे. काही माजी खासदार देखील आता आमच्या पक्षात येणार आहेत, काही विद्यमान खासदार देखील आमच्या पक्षात येऊ शकतात, त्यामध्ये काही अडचण आहे असं मला वाटत नाही. कारण विकासाचा मुद्दा आहे, लोकांना विकासकामे हवी आहेत, असं धर्मराव बाबा आत्राम म्हणाले.
तुतारीचे खासदार तुमच्याकडे कधीपर्यंत येऊ शकतात? असा प्रश्न विचारला असता, यावर बोलताना धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटलं की, मला वाटतं की १२ डिसेंबर पर्यंत ते आमच्याकडे येऊ शकतात.
काँग्रेसचेही काही खासदार तुमच्या संपर्कात आहेत का? असं विचारलं असता धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटलं की, आता ते पुढे पाहू, पण त्यासाठी ऑपरेशन करावं लागेल. पण काँग्रेसमधून आमच्याकडे येण्यासाठी देखील काही खासदार इच्छुक आहेत. सर्वांना निधी पाहिजे, विकासकामे पाहिजेत. सर्वांच्याच अपेक्षा असतात की आपण निवडून आलो आहोत, तर लोकांची विकासकामे झाले पाहिजेत. त्या अनुषंगाने लोक आमच्याकडे येतील, असा दावा त्यांनी केला.





